तुळजापूर शहरात ड्रग्ज प्रकरणाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. तामलवाडी पोलिसांनी आज तुळजापूरमधील तीन युवकांना अटक केली असून, एमडी ड्रग्ज कार्टेलशी त्यांचा थेट संबंध असल्याचा संशय आहे.
आतापर्यंत एकूण नऊ आरोपी गजाआड, तीन अद्याप फरार!
या प्रकरणात यापूर्वी सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. ताज्या कारवाईनंतर एकूण नऊ जण गजाआड झाले आहेत, तर तीन मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत .
अटक आरोपींची यादी:
- संगीता गोळे (मुंबई)
- अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे (तुळजापूर)
- युवराज देविदास दळवी (तुळजापूर)
- संदीप संजय राठोड (नळदुर्ग)
- संतोष खोत (मुंबई)
- विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे (सराटी, भाजप पदाधिकारी)
- तुळजापूरमधील तीन तरुण (नावे अद्याप गुलदस्त्यात)
फरार आरोपीमध्ये संगीता गोळे हीचा पती वैभव गोळे , तुळजापूरमधील स्वराज्य उर्फ पिनू तेलंग आणि एका राजकीय नेता यांचा समावेश आहे.
एमडी ड्रग्ज रॅकेट खोलवर पसरले!
पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासानुसार, तुळजापुरात एमडी ड्रग्जचे नेटवर्क खूप खोलवर पसरले आहे.
- हे केवळ काही स्थानिकांचा गुन्हा नाही, तर यामागे मोठं कार्टेल कार्यरत असल्याची शक्यता आहे.
- तपासादरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
- या ड्रग्ज रॅकेटमधील ‘बडे मासे’ अजूनही फरार आहेत.
पोलीस तपास वेगाने सुरू, आणखी मोठे खुलासे अपेक्षित!
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर करत आहेत.
आता पुढे काय?
✔ अटक आरोपींच्या CDR तपासणीने मोठे मासे जाळ्यात येणार का?
✔ फरार आरोपी लवकरच गजाआड होणार का?
✔ राजकीय वरदहस्त असलेल्या नेत्यांची नावे कधी उघडकीस येणार?
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आता आणखी गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कशा पद्धतीने होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.