छत्रपती संभाजीनगर: तुळजापूर येथील गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपी आणि माजी नगराध्यक्ष यांचे पती विनोद गंगणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. सुमारे एक महिना तुरुंगात काढल्यानंतर गंगणे यांना दिलासा मिळाला आहे.
काय आहे प्रकरण?
या वर्षी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये ड्रग्ज संबंधी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण ३८ संशयित आरोपी असून, त्यापैकी २२ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, तर १४ जण अद्याप फरार आहेत. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी, आलोक शिंदे आणि उदय शेटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वीच मंजूर झाला आहे.
गंगणेंच्या अटकेचे नाट्य
विशेष म्हणजे, या प्रकरणाची माहिती पोलिसांना स्वतः विनोद गंगणे यांनीच दिली होती, असे म्हटले जात आहे. सुरुवातीला, धाराशिव जिल्हा न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र, नंतर तो फेटाळण्यात आल्याने ७ जून रोजी गंगणे यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत होते.
जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गंगणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर, मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला, ज्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.