तुळजापूर शहर सध्या दहशतीच्या वणव्यात जळत आहे. रस्त्यावर तलवारी नाचल्या, गोळ्या झाडल्या गेल्या, एका तरुणाचा जीव धोक्यात आहे, आणि १८ तास उलटूनही पोलिसांना गुन्हेगार सापडत नाहीत. या सगळ्या गदारोळात तुळजापूरचे ‘हाय-प्रोफाईल’ भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील मात्र गायब आहेत. गल्लीतील गटारीचे उद्घाटन असो किंवा एखाद्या कामाचे श्रेय घेणे असो, क्षणाचाही विलंब न लावता ‘फेसबुक लाईव्ह’ (Facebook Live) करणाऱ्या राणा पाटलांचे मोबाईल नेटवर्क आता जाम झाले आहे का? श्रेयवादासाठी धडपडणारे तुमचे हात आणि सतत चालणारी तुमची जीभ, आता या रक्तरंजित घटनेवर चूप का? हा सवाल आज प्रत्येक तुळजापूरकर विचारत आहे.
नागपूर अधिवेशनातली ती ‘नाटकं’ आठवतात का?
हिवाळी अधिवेशनात नागपूरच्या विधानभवनात उभे राहून आमदार राणा पाटील यांनी तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणावरून गळा काढला होता. “माझ्या तुळजापूरची बदनामी होत आहे, बदनामी करणाऱ्यावर कठोर कारवाई करा,” अशी मागणी करताना त्यांचा आवेश पाहण्यासारखा होता. मग आज काय झाले आमदार साहेब? आज तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते, तुमच्याच जवळचे मानले जाणारे लोक भररस्त्यात तलवारी आणि पिस्तूल घेऊन दहशत माजवत आहेत, तेव्हा तुळजापूरची बदनामी होत नाहीये का? तेव्हा ‘प्रतिष्ठा’ आठवणारे राणा पाटील, आता स्वतःच्या कार्यकर्त्यांचे पाप झाकण्यासाठी सोयीस्कर मौन बाळगून आहेत का? ड्रग्ज प्रकरणात बदनामी दिसते, पण तलवारीच्या नंगानाचात ‘संस्कृती’ दिसते का?
हिंमत असेल तर ‘लक्षवेधी’ मांडा!
आमदार म्हणून तुमची जबाबदारी केवळ रिबिनी कापण्यापुरती मर्यादित नाही. तुळजापुरात जो हिंसाचार झाला, जे गोळीबार प्रकरण घडले, त्याबाबत येत्या अधिवेशनात ‘लक्षवेधी सूचना’ (Lakshavedhi) मांडण्याची हिंमत राणा पाटील दाखवणार आहेत का? की आरोपी आपलेच आहेत म्हणून पोलीस ठाण्यातील फोन फिरवून प्रकरण रफादफा करण्याचे काम पडद्यामागून सुरू आहे? जर तुम्ही विधानसभेत या गुंडगिरीविरोधात आवाज उठवला नाही, तर ‘मौनं संमती लक्षणम्’ या न्यायाने या गुंडगिरीला तुमचा छुपा पाठिंबा आहे, यावर शिक्कामोर्तब होईल.
सोयीस्कर राजकारण नको, उत्तर द्या!
श्रेयवादाच्या लढाईत पुढे असणाऱ्या नेत्यांनी जबाबदारी स्वीकारतानाही पुढे असले पाहिजे. तुमच्या राजकीय छत्रछायेखाली जर गुंड पोसले जात असतील, आणि त्यामुळे सर्वसामान्यांचा जीव टांगणीला लागत असेल, तर हे पाप तुम्हाला फेडावे लागेल. जनतेला तुमचे ‘फेसबुक लाईव्ह’ नको आहे, तर शहरात शांतता हवी आहे.
राणा पाटील, लक्षात ठेवा, निवडणुकीच्या तोंडावर पायाखालची वाळू सरकली म्हणून दहशतीचा आधार घेता येईल, पण जनतेच्या मनातून उतरलात तर पुन्हा वर चढणे कठीण जाईल. त्यामुळे बोला राणा पाटील, बोला! हे मौन सोडा, अन्यथा जनता तुम्हाला मतपेटीतून कायमचे गप्प केल्याशिवाय राहणार नाही.
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह






