तुळजापूर : जुन्या भांडणाच्या कारणावरून गैरकायदेशीर जमाव जमवून एका कुटुंबाला लाथाबुक्यांनी, लाकडी फळीने आणि दगडाने मारहाण केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे घडली आहे. याप्रकरणी १० जणांविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अण्णा हानुमंत देवगुंडे (वय ४२ वर्षे, रा. काक्रंबा) यांनी २० ऑगस्ट २०२५ रोजी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, १७ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास काक्रंबा येथे ही घटना घडली. फिर्यादी अण्णा देवगुंडे, त्यांचे भाऊ, पत्नी आणि भावजयी यांना आरोपींनी मागील भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ केली.
त्यानंतर आरोपींनी एकत्र जमून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना लाथाबुक्यांनी, लाकडी फळी व दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच, जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि फिर्यादीच्या लुना गाडीवर दगड मारून तिचे नुकसान केले.
याप्रकरणी पोलिसांनी कुमार धोंडीबा देवकते, प्रशांत युवराज देवगुंडे, सिध्दनाथ कोरे, नागनाथ कोरे, दादा कुमार देवकते, सुनिल निवृत्ती देवगुंडे, मिना सुनिल देवगुंडे, राम सुनिल देवगुंडे, अश्विनी राम देवगुंडे आणि कविता नागनाथ कोरे (सर्व रा. काक्रंबा) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. तुळजापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.