तुळजापूर – तालुका कृषी अधिकारी तुळजापूर यांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे तुळजापूर लातुर बायपास रोडवर एका मोठ्या खत माफियांच्या कारवायीचा पर्दाफाश झाला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 598 रासायनिक खताच्या गोण्या जप्त केल्या आहेत ज्यांची अंदाजे किंमत 8,07,300 रुपये आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हणुमंत कोंडीबा बोराडे (वय 29), अविनाश बाळासाहेब दुबाले (वय 21) आणि जयदीप दयारामभय भट्ट (वय अज्ञात) हे तिघे जण वाहनातून हे खत घेऊन जात होते. तपासणीत असे आढळून आले की हे खत “प्रधानमंत्री भारतीय जनउर्वरक परियोजना” आणि “भारतीय जनउर्वरक परियोजना” या नावाखाली विकले जात होते. मात्र, हे खत खोटे आणि भेसळयुक्त असल्याचे सिद्ध झाले.
या प्रकरणी, तालुका कृषी अधिकारी अवधुत मधुकर मुळे यांनी भारतीय दंड संहिता कलम 318(4), 336(2), 336(3) आणि खत नियंत्रण आदेश 1985 अधिनियम कलम 7, 5, 19, सी (2), 21 क्लॉज 8 (3), तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3(2)(अ)(डी), 7 आणि 9 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी आरोपी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आणि अधिकृत विक्रेत्यांकडूनच खत खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
हे प्रकरण, राज्यातील खत माफियांच्या वाढत्या धाडसीपणावर प्रकाश टाकते. या घटनेचा तपास त्वरित पूर्ण करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.