तुळजापूर: शहरातील घाटशिळ रोड परिसरात पावसामुळे आडोशाला थांबलेल्या एका व्यावसायिकाला दोन अज्ञात इसमांनी लुटल्याची घटना घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेत सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ३७,००० रुपयांचा ऐवज हिसकावून चोरट्यांनी पलायन केले. ही घटना २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत राघवेंद्र बालाजीसिंग राजपुत (वय ३३, रा. केसरजवळगा, ता. उमरगा) यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी राजपुत हे २२ ऑक्टोबर रोजी आपल्या पत्नीला सणानिमित्त माहेरी सोडून तुळजापूर येथे आले होते. येथील पाटीलवाडा हॉटेलमध्ये जेवण करून ते परत जात असताना पाऊस सुरू झाला.
पावसामुळे ते दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घाटशिळ रोड येथील एका काट्यावर थांबले असता, दोन अज्ञात इसम त्यांच्याजवळ आले, त्यांनी राजपुत यांना बाजूला घेऊन त्यांच्याजवळील ऐवज हिसकावून घेतला व तेथून पळ काढला.
या घटनेत चोरट्यांनी १५,००० रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले , २,००० रुपये किमतीचे तीन तोळ्याचे चांदीचे कडे १२,००० रुपयांचा रेडमी कंपनीचा मोबाईल आणि ५०० रुपयांच्या १६ नोटा अशी एकूण ८,००० रुपयांची रोख रक्कम , असा एकूण ३७,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
घटनेनंतर राजपुत यांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत. अखेर त्यांनी २८ ऑक्टोबर रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
फिर्यादीचा पोलिसांवर गंभीर आरोप
राघवेंद्र राजपुत यांनी आरोप केला आहे की, “लूटमार झाल्यानंतर त्याच दिवशी (२२ ऑक्टोबर) तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता, पोलिसांनी तक्रार घेतली नाही. उलट, निरीक्षक मांजरे यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.”
यानंतर राजपुत हे आपल्या गावी परतले. दुसऱ्या दिवशी त्यांनी भाजपा नेते संताजी चालुक्य यांना फोनवरून घडलेला प्रकार सांगितला. श्री. चालुक्य यांनी निरीक्षक मांजरे यांना फोन केल्यानंतर पोलिसांनी केवळ किरकोळ गुन्हा नोंदवल्याचा आरोपही राजपुत यांनी केला आहे.
या प्रकारानंतर, राजपुत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोशल मीडिया राज्य प्रमुखांशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. या तक्रारीची दखल घेत, राज्य सोशल मीडिया प्रमुखांनी धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांशी (SP) चर्चा केली. अखेर, पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर निरीक्षक मांजरे यांनी २८ ऑक्टोबर रोजी रीतसर गुन्हा दाखल करून घेतला.
या संपूर्ण प्रक्रियेत निरीक्षक मांजरे आणि इतर कर्मचाऱ्यांनी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोपही फिर्यादी राजपुत यांनी केला आहे. या गंभीर आरोपांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.
श्री क्षेत्र तुळजापूर शहरात मागील काही दिवसांपासून चोऱ्या, पाकीटमारी आणि लूटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज किमान एक तरी गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. तुळजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मांजरे यांच्या निष्क्रिय आणि ढिसाळ कारभारामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून, भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया जनतेमधून व्यक्त होत आहे.





