तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने डोके वर काढले असून, खुनाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. केशेगाव आणि फुलवाडी येथील खुनाच्या घटना ताज्या असतानाच आता जळकोट येथे एका वृद्ध महिलेचा निर्घृण खून झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. विशेष म्हणजे, पैशांच्या आणि सोन्याच्या लोभापायी सख्या नातवानेच आपल्या आजीचा काटा काढल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील अंबिकानगर भागात सुभद्राबाई राम पाटील (वय ७०) या वृद्ध महिला वास्तव्यास होत्या. सुभद्राबाई यांच्या अंगावर अंदाजे १५ तोळे सोने होते. तसेच, त्यांच्या शेतात पवनचक्की उभारणीचे काम सुरू असल्याने त्यांना त्याचे ६ लाख रुपये मिळाले होते. हीच संपत्ती त्यांच्या जीवावर बेतली असल्याचे बोलले जात आहे.
सुभद्राबाई यांचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात हा खून चोरीच्या उद्देशाने किंवा संपत्तीच्या वादातून झाल्याचा संशय बळावला असून, पोलिसांनी मयत महिलेच्या नातवाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
नळदुर्ग हद्दीत सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
- गेल्या काही दिवसांत नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. केशेगाव आणि फुलवाडी पाठोपाठ आता जळकोटमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला असून, आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.






