तुळजापूर : नागपूरकडे निघालेला विदेशी दारूचा टेम्पो अडवून, चालत्या गाडीत चढून तब्बल ३ लाख १० हजार रुपयांची दारू चोरून नेल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यात घडली आहे. काक्रंबा गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या फिल्मी स्टाईल चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात चार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हनुमंत विश्वनाथ चोपडे (वय २७, रा. मुतखेड, जि. परभणी) असे फिर्यादी टेम्पो चालकाचे नाव आहे. ते आपल्या टेम्पो (क्र. एमएच २६ बी.ई. ९३८७) मध्ये इस्लामपूर येथील राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्यातून विदेशी दारूचा साठा घेऊन नागपूरच्या दिशेने निघाले होते. या टेम्पोमध्ये ‘ऑफिसर चॉईस ब्ल्यू प्युअर ग्रीन व्हिस्की’चे २८ बॉक्स आणि ‘ऑफिसर चॉईस प्रेस्टीज व्हिस्की’चे ३ बॉक्स असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा माल होता.
मंगळवार, दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास टेम्पो काक्रंबा गावाजवळील पुलाजवळच्या कच्च्या रस्त्यावरून जात होता. यावेळी अज्ञात चार व्यक्तींनी टेम्पोमध्ये चढून आतील दारूचे बॉक्स चोरून नेले. हा सर्व प्रकार काही क्षणात घडल्याने चालकाला प्रतिकार करण्याची संधी मिळाली नाही.
या घटनेनंतर चालक हनुमंत चोपडे यांनी बुधवार, दिनांक ०६ ऑगस्ट २०२५ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.