तुळजापूर – तीर्थक्षेत्र तुळजापुरात ‘कुंपणानेच शेत खाल्ल्याचा’ धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीच्या एका कर्मचाऱ्यानेच बँकेचे शटर तोडून तब्बल ३४ लाख ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही चोरी रविवारी (दि. ३) भरदुपारी घडली.
याप्रकरणी संस्थेतच कार्यरत असलेला दत्ता नागनाथ कांबळे (रा. धारूर, ता. जि. धाराशिव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सध्या फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीच्या शाखेत दत्ता कांबळे हा कर्मचारी म्हणून कार्यरत होता. त्यानेच रविवारी दुपारी १२.३० ते १.४६ च्या सुमारास बँकेच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बँकेत ठेवलेली ३४ लाख ६० हजार ८०६ रुपयांची रोख रक्कम चोरून तो पसार झाला.
सोमवारी (दि. ४) सकाळी बँक उघडल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. शाखेचे व्यवस्थापक सुनील माणिकराव साळुंके (वय ५७) यांनी तात्काळ तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून कर्मचारी दत्ता कांबळे याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (४), ३३१ (३) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एकाच आठवड्यात जिल्ह्यातील बँकेतील चोरीची ही दुसरी मोठी घटना असून, या घटनेत बँकेचा कर्मचारीच आरोपी निघाल्याने शहराच्या आर्थिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आरोपी दत्ता कांबळे याचा शोध घेत आहेत.