तुळजापूर शहराची सध्याची अवस्था पाहता, ‘गुंडाराज’ हा शब्दही फिका पडावा अशी स्थिती आहे. थेट पोलीस ठाण्यात घुसून वर्दीतील पोलिसाला अश्लील शिवीगाळ करण्याची हिंमत होते, याहून अधिक गंभीर काय असू शकते? हे कशाचे लक्षण आहे? केवळ वाढत्या गुंडगिरीचे नव्हे, तर पोलिसांचा वचक पूर्णपणे संपुष्टात आल्याचे आणि पोलीस यंत्रणाच पोखरली गेल्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
तुळजापुरात आज अवैध धंद्यांनी जो हातपाय पसरले आहेत आणि गुंडगिरीने जे थैमान घातले आहे, त्याचे मूळ कारण पोलिसांचे दुर्लक्ष आणि त्याहून गंभीर म्हणजे त्यांची ‘वसुली’तील मग्नता आहे. खाकी वर्दीचा मान कायद्याचे रक्षण करण्यासाठी असतो, वसुलीसाठी नव्हे. पण इथे तर वर्दीचा वापरच अवैध धंद्यांना अभय देण्यासाठी आणि स्वतःची तुंबडी भरण्यासाठी होत असल्याचे चित्र आहे. जेव्हा पोलीसच ‘मिंधे’ बनतात, तेव्हा गुंडांची हिंमत गगनाला भिडणारच. पोलीस ठाणे, जे सर्वसामान्यांसाठी सुरक्षिततेचे प्रतीक असायला हवे, ते आज गुंडांसाठी शिवीगाळ करण्याचे आणि कायद्याला आव्हान देण्याचे व्यासपीठ बनले आहे, हे पाहून मन विषण्ण होते.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील प्रकार म्हणजे या पोखरलेल्या व्यवस्थेचा आरसा आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडल्यानंतरही संबंधित तरुणावर साधा गुन्हा दाखल झाला नाही. माफी मागून प्रकरण मिटवण्यात आले? हे कसले कायदेशीर राज्य? ही तर गुंडांपुढे पोलिसांचे लोटांगण घालण्यासारखीच अवस्था आहे!
दोन महिन्यांपूर्वीच्या या घटनेचा आणि अलीकडेच सुगंधित तंबाखूच्या पिकअपला गुन्हा दाखल न करता ‘तोडपाणी’ करून सोडण्याच्या प्रकाराचा थेट संबंध आहे हे स्पष्ट आहे. ज्या पोलिसाला शिवीगाळ झाली, तोच ‘वसुली’त गुंतलेला होता, हे समोर येणे म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचे अंतरंग उघड करणारे आहे. हे पोलीस कायद्याचे रक्षक आहेत की अवैध धंद्यांचे संरक्षक? जे पोलीस अवैध धंद्यातून ‘तोडपाणी’ करतात, जे पोलीस गुंडांपुढे मिंधे बनतात, त्यांच्याकडून कायदा आणि सुव्यवस्थेची अपेक्षा कशी करणार?
तुळजापूरची अवस्था गंभीर आहे. पोलीस दलातील काही मुठभर ‘वसुलीबाज’ आणि ‘मिंधे’ लोकांमुळे संपूर्ण खाकी वर्दी बदनाम होत आहे आणि सर्वसामान्य नागरिक भयभीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
केवळ माफी मागून प्रकरणे मिटवणारे आणि ‘तोडपाणी’ करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत पोलीस दल स्वतःचा वचक निर्माण करत नाही आणि ‘वसुली’ सोडून कायद्याचे राज्य खरे अर्थाने स्थापित करत नाही, तोपर्यंत तुळजापुरात ‘गुंडाराज’ संपणार नाही हे दुर्दैवी सत्य आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण? याचे उत्तर पोलीस दलाला आणि पर्यायाने शासनाला द्यावेच लागेल.
Video