तुळजापूर: पत्नीचे परपुरुषाशी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवरून बोलणे सुरू असल्याच्या कारणावरून होणाऱ्या सततच्या वादाला आणि त्रासाला कंटाळून एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना तुळजापूर तालुक्यातील केमवाडी शिवारात ३१ ऑक्टोबर रोजी घडली.
याप्रकरणी मयत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून, मयताची पत्नी आणि तिचा मित्र अशा दोघांविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तामलवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहिनीनाथ दिगंबर पोफळे (वय २८, रा. गावडी दारफळ, ता. उत्तर सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गहिनीनाथ यांनी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:३० ते रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील केमवाडी शिवारातील गट क्र. २५३ मधील एका पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेप्रकरणी मयताचे वडील दिगंबर बाबा पोफळे (वय ७४, रा. गावडी दारफळ, ता. उत्तर सोलापूर) यांनी २ नोव्हेंबर रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, मयत गहिनीनाथ याची पत्नी श्वेता गहीनीनाथ पोफळे (ह.मु. तोकर वस्ती, बाळे, सोलापूर) ही अजय पवार (रा. गुळवंची, ता. उत्तर सोलापूर) या परपुरुषाशी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे बोलत असे.
याच कारणावरून ती मयत गहिनीनाथ यांच्याशी सतत भांडण-तक्रारी करून त्यांना मानसिक त्रास देत होती. पत्नी श्वेता आणि अजय पवार यांच्या या त्रासाला कंटाळूनच गहिनीनाथ पोफळे यांनी आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या फिर्यादीवरून तामलवाडी पोलिसांनी श्वेता पोफळे आणि अजय पवार या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






