तुळजापूर – तुळजापूर पोलीस ठाण्याच्या परिसरात सध्या “पवनचक्की गुत्तेदारांचे” अवतार काही वेगळ्याच पातळीवर गेले आहेत. पोलीस ठाणे म्हणजे काय, एकदम 5 स्टार हॉटेलसारखं वाटावं अशी या गुत्तेदारांची एन्ट्री! आलीशान गाड्यांमधून उतरणारे हे महाशय, कमरेला चकचकीत पिस्तूल, आणि सोबत WWE मध्ये काम करता का? असा प्रश्न पडेल अशी बॉडीगार्डची फौज!
आता प्रश्न असा आहे की, हे पवनचक्की गुत्तेदार पोलीस ठाण्यात रोज-रोज काय करतात? तक्रार देतात की तक्रार घेतात? की पोलीस ठाण्यात स्वतःची शाखा उघडलीय? गावकरी म्हणतात की, ‘हे गुत्तेदार पवनचक्कीपेक्षा पिस्तूलच जास्त फिरवतायत!’
तुळजापूर आहे की बिहार?
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी या पवनचक्की कंपन्यांच्या दादागिरीला जोरदार प्रतिकार केल्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाली होती. पण आता तर गुत्तेदारांचे लाड वेगळ्याच लेव्हलला पोहोचलेत. ‘आम्ही VIP आहोत’ असा आव आणत खुलेआम शस्त्रप्रदर्शन करणाऱ्या या मंडळींना कायद्याची भीती नाही का?
पोलीस ठाण्यात या गुत्तेदारांची मुजोरी वाढत चालली आहे, आणि त्यांना उघडपणे पिस्तूल लटकवायची मुभा दिलीय की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. शेतकरी विचारतायत, “आम्हाला रक्षण पोलीस करणार की गुत्तेदारांच्या पिस्तुलांपासून स्वतःच वाचायचं?”
पवनचक्की ठेकेदार की नामांकित गुंड?
सदर गुत्तेदारांवर आधीच गुन्हे दाखल आहेत, तरीही हे महाशय आपल्या बॉडीगार्डसह पोलिस स्टेशनात उभे राहतात, जणू काही त्यांनीच कायदा लिहिला आहे! पोलिस ठाण्याच्या आवारात गाड्या लावायच्या, छाती पुढे काढून फिरायचं, आणि जनतेला “बघून घ्यायला” धमकवायचं, असा काहीसा प्रकार सुरु आहे.
आता पोलिसांनी ठरवायचं – हे “वन-वे” गुत्तेदारांचं शस्त्र प्रदर्शन असंच चालू राहणार, की पोलिस “टू-वे” ॲक्शन प्लॅन काढून यांना आळा घालणार?
धाराशिवचे पोलीस अधीक्षक आता यावर काय भूमिका घेतात याकडे सामान्य जनतेचं लक्ष लागलंय. गुत्तेदारांसाठी पोलीस ठाण्याचा परिसर “व्हीआयपी पार्किंग झोन” राहणार की पोलिस प्रशासन खरंच जनतेच्या बाजूने उभं राहणार? हा प्रश्न सध्या तुळजापूरभर गाजतोय!