तुळजापूर – तुळजापूर नगर परिषदेची निवडणूक आणि नगराध्यक्ष पदाची चुरस लक्षात घेता, शहरातील अत्यंत प्रभावशाली असलेल्या ‘श्री तुळजाभवानी पुजारी मंडळा’ने आपली भूमिका आक्रमक केली आहे. मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी नगराध्यक्ष पदाच्या सर्व उमेदवारांना पत्र लिहून शहराचा विकास आराखडा, मंदिरातील सोयीसुविधा आणि पुजाऱ्यांचे हक्क यासह ८ प्रमुख मुद्यांवर लेखी हमीपत्र (अॅफिडेविट) मागितले आहे. जो उमेदवार या मागण्यांवर सकारात्मक लेखी हमी देईल, त्याचाच विचार केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका पुजारी मंडळाने घेतली आहे.
१८०० कोटींच्या विकास आराखड्याला विरोध आणि पर्यायी भूमिका
पुजारी मंडळाने आपल्या पत्रात १,८०० कोटी रुपयांच्या प्रस्तावित विकास आराखड्यावर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. शहराचा विकास केवळ पश्चिम बाजूला (रामदरा तलाव, आराधवाडी परिसर) न करता, तो सर्वांगीण असावा, अशी मागणी केली आहे. तसेच, या विकास आराखड्यामुळे शहरातील छोटे व्यापारी, लॉज चालक, फेरीवाले आणि स्थानिक नागरिक विस्थापित होण्याची भीती व्यक्त करत, उमेदवारांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे म्हटले आहे.
पुजारी मंडळाने मांडलेले प्रमुख ८ मुद्दे:
१. विकास आराखडा: १,८०० कोटींचा विकास आराखडा फक्त एका बाजूला न राबवता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी असावा.
२. पूजा व अभिषेक: मंदिरात पंचामृत अभिषेक आणि सिंहासन पूजेची संख्या व वेळ वाढवून मिळावी. लॉगिन यंत्रणा आणि पासबाबत तत्काळ निर्णय व्हावा.
३. पुजाऱ्यांचे हक्क व सोयी: पुजाऱ्यांचे हक्क अबाधित राहावेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र ‘आराध्य सेवा रूम’, विश्रांती कक्ष आणि लॉकर रूमची व्यवस्था असावी.
४. रांगा आणि जागा: विकास आराखड्यात दर्शनासाठी आणि पूजेसाठी स्वतंत्र रांगा आरक्षित असाव्यात. धार्मिक विधींच्या साहित्यासाठी मंदिरात जागा मिळावी.
५. विमा व उत्पन्न: पुजारी बांधव आणि सेवेकरी यांना वैद्यकीय विमा संरक्षण मिळावे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी पाठपुरावा व्हावा.
६. पारदर्शक कारभार: मंदिर संस्थानचा कारभार पारदर्शक असावा. गैरकारभारावर कारवाई व्हावी आणि विश्वस्त बैठकीपूर्वी पुजारी मंडळाला विश्वासात घ्यावे.
७. विस्थापितांचा प्रश्न: विकास आराखड्यामुळे बाधित होणारे व्यापारी, नागरिक आणि पुजारी यांच्या उपजीविकेचे नुकसान होऊ नये, यासाठी उमेदवाराची भूमिका काय असेल?
८. पायाभूत सुविधा: तुळजापूर शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, पार्किंग, पथदिवे, ड्रेनेज लाईन आणि यात्रा नियोजन यातील त्रुटी दूर करून शहराची बदनामी थांबवावी.
लेखी हमीपत्राची अट
श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे की, “वास्तविक नगराध्यक्ष आणि आमदार हे पद स्थानिक पुजारी, व्यापारी आणि नागरिकांसाठी विश्वस्त स्वरूपाचे असते. त्यामुळे वरील सर्व समस्यांवर उमेदवाराने लेखी स्वरूपात भूमिका स्पष्ट करावी आणि हमीपत्र द्यावे. त्यानंतरच आम्ही ही माहिती आमच्या पुजारी बांधवांना देऊ.”
निवडणुकीच्या तोंडावर पुजारी मंडळाने टाकलेला हा ‘गुगली’ सर्वच पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांसाठी अडचणीचा ठरू शकतो, तर काहींसाठी विजयाची संधी ठरू शकतो. आता उमेदवार यावर काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण तुळजापूरचे लक्ष लागले आहे.






