तुळजापूर: तुळजापूर शहरात काँग्रेसचे उमेदवार अमर मगर यांचे चुलत बंधू कुलदीप मगर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना न्यायालयाने मंगळवार, २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणात गोळीबार करणारा मुख्य आरोपी सूरज ( नन्नु ) साठे हा अद्याप फरार असून, या टोळीचा मुख्य सूत्रधार असलेल्या ‘प्रमुखा’ला (Mastermind) अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
७ आरोपी पोलीस कोठडीत, शूटर फरार
१६ डिसेंबर रोजी सायंकाळी कुलदीप मगर यांच्यावर झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी वेगाने तपास करत आतापर्यंत ७ आरोपींना अटक केली आहे. या सर्वांना तुळजापूर उपजिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, प्रत्यक्ष गोळीबार करणारा मुख्य आरोपी सूरज (नन्नु )साठे हा घटनेनंतर फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.
टोळी प्रमुखाला अटक करा: पुरवणी जबाबाची मागणी
या हल्ल्यामागे मोठी राजकीय किनार असून केवळ गुंडांना पकडून हा तपास पूर्ण होणार नाही, असा सूर उमटत आहे. अटकेत असलेले आरोपी हे भाजपचे उमेदवार आणि ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद उर्फ पिटू गंगणे यांचे समर्थक असल्याचे फिर्यादीत यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जखमी कुलदीप मगर यांचा ‘पुरवणी जबाब’ (Supplementary Statement) नोंदवून घेऊन, या गुन्हेगारी टोळीचा जो प्रमुख (Gang Leader) आहे, त्यालाही या गुन्ह्यात सहआरोपी करावे आणि तातडीने अटक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
नेमके प्रकरण काय?
१६ डिसेंबर २०२५ रोजी तुळजापुरातील विठाई हॉस्पिटलसमोर कुलदीप मगर यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला होता. “तू पिटू गंगणेच्या विरोधात प्रचार का केला? तुला आता जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपींनी गोळीबार केला आणि धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मगर सध्या सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. जखमी अवस्थेतही त्यांनी धाडसाने दोन आरोपींना (शुभम साठे आणि सागर गंगणे) पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
सध्या तुळजापूर पोलीस निरीक्षक अन्नासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपी सूरज साठे याचा शोध सुरू असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस पोहोचणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






