तुळजापूर – धर्म आणि अध्यात्मासाठी ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूर नगरीला अवैध धंद्यांनी पोखरल्याची ओरड अखेर खरी ठरली आहे! पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने थेट ‘राज पॅलेस’ या बड्या आसामीच्या अड्ड्यावर धाड टाकून मटकाकिंग नाईकवाडी याला ‘कल्याण’चा मटका घेताना रंगेहाथ दबोचल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे एकूण २८ मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता असून, शहराला लागलेला अवैध धंद्यांचा कलंक पुसण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून तुळजापूर शहर मटका, जुगार, चक्री जुगार अशा अवैध धंद्यांचे माहेरघर बनले होते. स्थानिक पोलिसांच्या ‘अर्थपूर्ण’ आशीर्वादाने हे गोरखधंदे राजरोसपणे सुरू असल्याची दबक्या आवाजातील चर्चा आता उघड झाली आहे. ‘राज पॅलेस’वर झालेली ही कारवाई म्हणजे थेट व्यवस्थेलाच दिलेला इशारा असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेला नाईकवाडी हा मटका जगतातील मोठे नाव असून, त्याच्या अटकेमुळे अनेक बड्या हस्तींचे धाबे दणाणले आहेत. त्याच्या चौकशीतून आणखी २८ जणांची नावे समोर आली असून, हे सर्वजण सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत.
हा मटक्याचा अड्डा ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या एका बड्या हस्तीचा असल्याची चर्चा आहे. स्पेशल टीमने शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून पहाटे पाच पर्यंत राज पॅलेस परिसराची कसून तपासणी करून, फरार आरोपीचा शोध घेतला, यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
धाराशिव रोडवर (आठवडी बाजार ) परिसरात राज पॅलेस बिल्डींग आहे. खालील बाजूस दुकाने, लॉज आहे आणि वरती अपार्टमेंट आहेत. त्यातील एक अपार्टमेंट ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा आहे. येथेच मटक्याची बुकी घेतली जात होती. ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यासाठी एसपीची स्पेशल टीम आली होती तेव्हा हा मटकाकिंग सापडल्याची चर्चा आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणामुळे तुळजापूरची राज्यभर बदनामी झाली होती. त्यातून सावरत नाही तोच आता मटका आणि जुगाराच्या या साम्राज्याने शहराच्या प्रतिमेला आणखी काळिमा फासला आहे. या अवैध धंद्यांना अनेक राजकीय वरदहस्त असल्याचाही आरोप सातत्याने होत आला आहे. मटका बुकी चालवणाऱ्यांशी अनेक राजकीय पुढाऱ्यांचे लागेबांधे असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. एसपींच्या स्पेशल टीमने केलेल्या या धाडसी कारवाईमुळे सामान्य तुळजापूरकरांमधून मात्र समाधान व्यक्त होत आहे. मात्र, केवळ छोट्या माशांवर कारवाई न करता यामागच्या सूत्रधारांना आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या ‘पांढरपेशा’ गुन्हेगारांनाही कायद्याच्या कचाट्यात आणण्याची खरी गरज आहे, अशी मागणी जोर धरत आहे.
आता या २८ जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना कधी यश येते आणि तुळजापूर खऱ्या अर्थाने अवैध धंद्यांच्या विळख्यातून कधी मुक्त होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.