तुळजापूर – शहरातील सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल आणि धोका निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा उभी करणे एका चालकाला चांगलेच महागात पडले आहे. तुळजापूर पोलिसांनी या रिक्षाचालकावर स्वतः पुढाकार घेत गुन्हा दाखल केला असून, या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांना एक प्रकारे इशारा मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर शहरातील जुने बसस्थानकासमोरील विश्वनाथ कॉर्नर येथे एक रिक्षा (क्र. एमएच २५ एके ०३९७) सार्वजनिक रस्त्यावर अत्यंत धोकादायकरीत्या उभी केलेली पोलिसांच्या निदर्शनास आली. यामुळे इतर वाहनांच्या रहदारीस आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत होता.
पोलिसांनी चौकशी केली असता, सदर रिक्षा जब्बार काशीम पटेल (वय ४९, रा. वेताळनगर, तुळजापूर) यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद देत, सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे वाहन चालवून किंवा उभे करून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी जब्बार पटेल यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.