तुळजापूर – येथील यात्रा मैदानासाठी भूसंपादित करण्यात आलेल्या जमिनीवर बेकायदेशीर लेआऊट करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज मलबा हॉस्पिटलसमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुमारे दीडशे महिला आणि दोनशे पुरुषांचा सहभाग होता. रस्ता रोको सुमारे दीड तास चालला.
तुळजापूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून, येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी सन १९९८ मध्ये सर्वे क्रमांक १३८ आणि १३९ या ठिकाणी २ हेक्टर ६३ आर इतकी जमीन शासनाने भूसंपादित केली होती. तथापि, या जमिनीवर काही लोकांनी संगनमताने बेकायदेशीर लेआऊट करून जमीन विक्री केली. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी असलेल्या यात्रा मैदानाच्या उद्देशावर पाणी फेरले गेले आहे.
गैरवापर आणि बेकायदेशीर लेआऊटची तात्काळ रद्दबातल करण्याची मागणी
यात्रा मैदानासाठी भूसंपादित झालेल्या जमिनीवर बेकायदेशीर लेआऊट तयार करणाऱ्या संबंधितांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करावी, तसेच महसूल दप्तरी महाराष्ट्र शासनाची नोंद घेऊन यात्रा मैदान भाविकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, तुळजापूर नगर परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांनी नगरसेवक पदाचा गैरवापर करून कपटी मार्गाने या जमिनीवर बोगस लेआऊट तयार केले. या प्रकारामुळे यात्रा मैदानाच्या जागेचा हेतू अपयशी ठरला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे. तसेच पोलिस अधीक्षक, तहसिलदार, पोलिस निरीक्षक आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
मलबा हॉस्पिटल यात्रा मैदानासमोर आंदोलन करून भाविकांनी प्रशासनाच्या ढिलाईवर रोष व्यक्त केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाकडून तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.