धाराशिव : तुळजापूर शहरातील घाटशिळ रोड परिसरात एका व्यावसायिकाला भरदिवसा लुटल्याप्रकरणी (गु.र.नं. ४०६/२०२५) स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. मनोज उर्फ पापा महादेव धोत्रे (वय ३०, रा. वेताळ नगर, तुळजापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांचे पथक ३१ ऑक्टोबर रोजी तुळजापूर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, त्यांना या गुन्ह्यातील आरोपीबाबत गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे पथकाने मनोज धोत्रे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारासह मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पथकाने आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरलेला एक रेडमी कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे. आरोपीला पुढील तपासासाठी तुळजापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
काय होते प्रकरण?
२२ ऑक्टोबर रोजी राघवेंद्र बालाजीसिंग राजपुत (वय ३३, रा. केसरजवळगा) हे पावसामुळे घाटशिळ रोड येथील एका काट्यावर थांबले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी त्यांना लुटले. यात १५,००० रुपयांचे सोन्याचे कानातले, २,००० रुपयांचे चांदीचे कडे, १२,००० रुपयांचा रेडमी मोबाईल आणि ८,००० रुपये रोख, असा एकूण ३७,००० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून चोरट्यांनी पलायन केले होते.
फिर्यादीच्या गंभीर आरोपामुळे गाजले होते प्रकरण
हे प्रकरण तुळजापूर पोलिसांच्या भूमिकेमुळे राज्यभर गाजले होते. फिर्यादी राघवेंद्र राजपुत यांनी आरोप केला होता की, “घटनेच्या दिवशी (२२ ऑक्टोबर) तक्रार देण्यास गेलो असता, निरीक्षक मांजरे यांनी तक्रार घेतली नाही व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.”
यानंतर राजपुत यांनी भाजपा नेते संताजी चालुक्य व मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडिया कक्षाशी संपर्क साधला. या तक्रारीची दखल घेतल्यानंतर, अखेर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या आदेशानंतर २८ ऑक्टोबर रोजी, म्हणजे घटनेच्या सहा दिवसांनी, तुळजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला होता. या संपूर्ण प्रक्रियेत निरीक्षक मांजरे आणि इतर कर्मचाऱ्यांनी दबाव आणल्याचा गंभीर आरोपही फिर्यादीने केला होता.
या पथकाने केली कारवाई
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोह- राहुल नाईकवाडी, समाधान वाघमारे, बळीराम शिंदे, अशोक ढगारे, चालक विनायक दहिहांडे, योगेश कोळी तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोअं सुर्यवंशी व भोसले यांच्या पथकाने केली आहे.





