तुळजापूर: श्री तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या नावाखाली मंदिराचे शिखर पाडण्याचा घाट घातला जात असल्याच्या आरोपांमुळे धाराशिव जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. एका जुन्या व्हिडिओ क्लिपमुळे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील पूर्णपणे अडचणीत आले असून, शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांना घेरले आहे. विशेष म्हणजे, या गंभीर विषयावर आमदार पाटील यांनी मौन बाळगले असून, त्यांच्या बचावासाठी भाजपचे इतर नेते पुढे येत असल्याने भाविकांमध्ये संभ्रम वाढत आहे.
व्हिडिओ क्लिपमुळे वाद पेटला
वादाची ठिणगी तेव्हा पडली, जेव्हा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटील यांचा एक जुना व्हिडिओ सार्वजनिक केला. या व्हिडिओमध्ये, तीर्थक्षेत्र विकासासाठी शिखर पाडावे लागेल, असे विधान राणा पाटील करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर येताच खळबळ उडाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी तुळजापुरात येऊन याविरोधात आंदोलनही केले.
यावर प्रतिक्रिया देताना आमदार राणा पाटील यांनी हे ‘बदनामीचे षडयंत्र’ असल्याचे म्हटले. मात्र, खासदार निंबाळकर यांनी लगेचच प्रतिप्रश्न केला की, “जर व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःच शिखर पाडण्याबद्दल बोलत असाल, तर हे षडयंत्र नेमके कोणाचे?” या सवालाने आमदार पाटलांची चांगलीच कोंडी झाली आहे.
भाजपकडून सारवासारव, पण मूळ प्रश्नाला बगल
या आरोप-प्रत्यारोपांनंतर आमदार राणा पाटील यांनी स्वतः पुढे येऊन स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यांच्या वतीने भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आणि माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. “ओमराजेंनी दाखवलेला व्हिडिओ अर्धवट आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच निर्णय घेतला जाईल,” असे राणा पाटील यांचे म्हणणे असल्याचे त्यांनी सांगितले.
नेमकी भूमिका काय?
या सर्व राजकीय गदारोळात मूळ प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला आहे. व्हिडिओ अर्धवट असो वा पूर्ण, पण श्री तुळजाभवानी देवीचे शिखर पाडण्याबाबत आमदार राणा पाटील आणि भाजपची अधिकृत भूमिका नेमकी काय आहे? ते या निर्णयाच्या बाजूने आहेत की विरोधात? यावर थेट उत्तर देण्याऐवजी ‘षडयंत्र’ आणि ‘अंतिम अहवाल’ अशी कारणे दिली जात असल्याने, भाजप या संवेदनशील विषयावर नेहमीप्रमाणेच संभ्रमाचे राजकारण करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.