धाराशिव : श्री तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देत असल्याच्या ऐतिहासिक क्षणावर आधारित १०८ फूट उंचीचे भव्य ब्राँझ शिल्प तुळजापूर येथे उभारण्यात येणार आहे. श्री तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत साकारल्या जाणाऱ्या या शिल्पासाठी फायबर मॉडेल सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली असून, आता शिल्पकारांना १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आपली मॉडेल्स सादर करता येणार आहेत.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली २.५ ते ३ फूट उंचीची फायबर मॉडेल्स मागविण्यात आली आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक शिल्पकारांकडे शिल्पकलेतील पदवी किंवा पदविका असणे आणि किमान १५ वर्षांचा व्यावसायिक अनुभव असणे अनिवार्य आहे. शिल्पाची निर्मिती करताना ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भांचा अचूक अभ्यास करणे बंधनकारक असून, यासाठी इतिहासकार आणि पुरातत्व विभागाने दिलेले संदर्भ अभ्यासणे आवश्यक आहे.
प्राप्त झालेल्या मॉडेल्समधून निवड समितीमार्फत पाच उत्कृष्ट मॉडेल्स निवडली जातील. या निवड झालेल्या प्रत्येक शिल्पकाराला १.५ लाख रुपयांचे मानधन दिले जाईल. त्यातून अंतिम निवड झालेल्या एका मॉडेलच्या शिल्पकारास १० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
पूर्वी, मॉडेल्स सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२५ होती. तथापि, अधिक कलाकारांना सहभागी होता यावे आणि उत्तम दर्जाची शिल्पे सादर व्हावीत, या हेतूने जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांनी ही मुदत १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
तयार मॉडेल्स कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयात स्वीकारले जातील. या उपक्रमाविषयी अधिक माहिती आणि मार्गदर्शक सूचना https://dharashiv.maharashtra.gov.in आणि https://shrituljabhavani.org या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाने राज्यातील कलावंत आणि शिल्पकारांना या ऐतिहासिक संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.