तुळजापूर: एकीकडे शासन आणि पर्यावरण मंत्रालय जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर ‘झाडे लावा, झाडे जगवा’ म्हणत कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, तर दुसरीकडे तुळजापूर तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाने गेल्या पाच वर्षात एकही झाड लावले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर जमदाडे यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीतून हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर जमदाडे यांनी १० सप्टेंबर २०२५ रोजी सामाजिक वनीकरण विभाग, तुळजापूर यांच्याकडे माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्ज दाखल केला होता. यामध्ये त्यांनी मागील ५ वर्षात तुळजापूर तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाने केलेल्या वृक्षारोपण कामांची सविस्तर माहिती, त्यावर झालेला खर्च, जिवंत झाडांची टक्केवारी (Survival Rate), कामासाठी नियुक्त केलेल्या संस्था व कंत्राटदारांची माहिती, तसेच कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती अशा एकूण आठ मुद्द्यांवर माहिती मागवली होती.
या अर्जाला उत्तर देताना वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण, तुळजापूर यांनी दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पत्राद्वारे कळवले आहे की, “मागील ५ वर्षांत या कार्यालयामार्फत तुळजापूर तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वृक्षारोपणाचे काम करण्यात आलेले नाही.” त्यामुळे अर्जदाराने मागितलेले वृक्षारोपण, खर्च, जगलेल्या झाडांची टक्केवारी, लावलेल्या झाडांच्या जाती इत्यादी सर्व माहिती ‘निरंक’ असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. विभागाने केवळ सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी उपलब्ध करून दिली आहे.
या धक्कादायक माहितीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
१. जर गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यात कोणतेही वृक्षारोपणाचे काम झाले नाही, तर मग सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय आणि त्यातील अधिकारी व कर्मचारी काय काम करत होते?
२. शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण मोहिमेपासून तुळजापूर तालुका वंचित का राहिला?
३. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कधी आढावा घेतला नाही का?
४. या कार्यालयासाठी शासनाकडून मिळणाऱ्या वेतनाचा आणि इतर खर्चाचा जनतेच्या पैशाचा अपव्यय नाही का?
या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाच्या योजना केवळ कागदावरच राहतात का, असा सवाल आता विचारला जात आहे. या गंभीर प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कार्यालयात शुकशुकाट, मग कर्मचारी जातात कोणत्या ‘फिल्ड’वर?
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, तुळजापूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात कर्मचारी कधीच हजर नसतात. चौकशीसाठी गेल्यावर केवळ एक शिपाई भेटतो आणि ‘साहेब फिल्डवर गेले आहेत,’ असे ठरलेले उत्तर देतो. आता माहिती अधिकारातूनच उघड झाले आहे की, मागील पाच वर्षांत वृक्षारोपणाचे कोणतेही काम झालेले नाही. त्यामुळे, “जर पाच वर्षात एकही झाड लावले नाही, तर हे सर्व कर्मचारी आणि अधिकारी नेमके कोणत्या फिल्डवर जातात?” असा संतप्त सवाल नागरिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विचारत आहेत. कोणतेही काम नसताना हे कार्यालय केवळ पोसून शासन काय साधत आहे आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय का करत आहे, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.