तुळजापूर : श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानाचे विश्वस्त सदस्य तथा व्यवस्थापक असलेले तुळजापूर तहसीलदार अरविंद शंकरराव बोळंगे यांच्या विरोधात विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तुळजापूर येथील जवाहर गल्ली येथील रहिवासी जयकुमार नागनाथ पांढरे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तहसीलदार बोळंगे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मंदिर संस्थानाच्या नियमांचे उल्लंघन करत व्हीआयपी दर्शन पासचे वाटप केले आणि त्यामुळे मंदिराचे आर्थिक नुकसान झाले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
२३ मे २०२५ रोजी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, तहसीलदार बोळंगे यांनी “अति महत्त्वाच्या व्यक्ती, वरिष्ठ अधिकारी, सन्माननीय व्यक्ती” या नियमांचे उल्लंघन करून स्वतःच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना, मित्रांना आणि हितसंबंधितांना भौतिक लाभ मिळवून दिला आहे. बोळंगे हे लातूरकडील असल्याने, लातूर बाजूकडील नागरिकांना व्हीआयपी दर्शनाचा जास्त लाभ मिळाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दर्शन नोंद रजिस्टरमध्ये पदनाम रकान्यात ‘व्यवसाय’ आणि ‘नोकरी’ असा उल्लेख असून, लातूरच्या नागरिकांच्या नोंदी जास्त आहेत. बोळंगे यांनी मंदिर संस्थानाच्या नियमांचे आणि ठरावाचे कोणतेही पालन केले नसल्याचे दिसत नाही, असेही तक्रारीत म्हटले आहे.
गंभीर बाब म्हणजे, शेरा या रकान्यात आमदार, मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या शिफारशीच्या ठिकाणी तहसीलदार यांचा ड्रायव्हर रवींद्र शिंदे यांच्या नावाची नोंद करून त्यांच्या कुटुंबीयांनाही व्हीआयपी दर्शनाचा लाभ दिला आहे. रवींद्र शिंदे यांनीही तहसीलदार साहेबांच्या शिफारशीची नोंद करून त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रांना व्हीआयपी दर्शनाचा लाभ घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणाची जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांनी विभागीय चौकशी करावी आणि व्हीआयपी दर्शन घेतलेल्या व्यक्ती कोणत्या पदावर कार्यरत आहेत किंवा त्या अति महत्त्वाच्या व वरिष्ठ अधिकारी, सन्माननीय व्यक्ती आहेत का, याची चौकशी करावी अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या नियमबाह्य वागण्यामुळे मंदिर ट्रस्टचे आणि शासनाचे जे आर्थिक नुकसान झाले आहे, ते दोषी व्यक्तींकडून त्यांच्या वेतनातून वसूल करण्यात यावे. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९ च्या कलम ८ नुसार गंभीर स्वरूपाची कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या आरोपांच्या पुराव्यासाठी दर्शन नोंद रजिस्टरच्या झेरॉक्स प्रती जोडण्यात आल्या आहेत. जर सदर प्रकरणावर विभागीय चौकशी करून कारवाई न झाल्यास, तुळजापूर येथील रामधरा तलावात जलसमाधी घेण्याचा इशारा तक्रारदार जयकुमार नागनाथ पांढरे यांनी दिला आहे. याला सर्वस्वी संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.