तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आलेल्या एका महिला भाविकाच्या गळ्यातील सुमारे १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेले. ही घटना काल (शनिवार, दि. १२ एप्रिल) सकाळी मंदिराच्या महाद्वारासमोर घडली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कालिंदा गोरख शिंदे (वय ५० वर्षे, रा. खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) या काल सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास श्री तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. मंदिराच्या महाद्वारासमोरून आत प्रवेश करत असताना तेथे मोठी गर्दी होती.
याच गर्दीचा फायदा साधत अज्ञात चोरट्याने कालिंदा शिंदे यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत अंदाजे १ लाख रुपये आहे, लंपास केले. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली.
फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माध्यमातून आरोपीचा शोध घेत आहेत.
येडेश्वरी मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलेची पर्स पळवली, १२०० रुपये लंपास
येरमाळा – श्री क्षेत्र येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाची पर्स गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. येरमाळा येथील मंदिर पायथ्याशी शनिवारी (दि. १२ एप्रिल) सकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी अशोक कवटे (वय ३५ वर्षे, रा. भोईनजे, ता. बार्शी, जि. सोलापूर) या दर्शनासाठी येरमाळा येथे आल्या होत्या. शनिवारी सकाळी सुमारे १० वाजता त्या येडेश्वरी मंदिराच्या पायथ्याशी असताना परिसरात मोठी गर्दी होती.
या गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीने पल्लवी कवटे यांच्या हाताला झटका दिला आणि त्यांच्या हातातील काळ्या रंगाची पर्स हिसकावून पळ काढला. या पर्समध्ये १,२०० रुपये रोख रक्कम होती.
घटनेनंतर पल्लवी कवटे यांनी तातडीने येरमाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.