तुळजापूर: आई तुळजाभवानीच्या दरबारात दर्शनासाठी लागलेल्या रांगेत घुसखोरी करणे आणि गाभाऱ्यात मनमानी कारभार करणाऱ्या मुजोर पुजाऱ्यांवर तुळजाभवानी मंदिर संस्थानाने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या अवघ्या ६ महिन्यांत तब्बल १२ पुजाऱ्यांना मंदिरप्रवेशबंदीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. या कारवाईमुळे संस्थान सक्रिय झाल्याचे चित्र दिसत असून, गैरप्रकार करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवण्यात आला आहे.
नेमका काय आहे प्रकार?
तुळजाभवानी मंदिरात, विशेषतः गर्दीच्या काळात, काही पुजारी भाविकांना दर्शनाच्या रांगेत घुसखोरी करण्यास मदत करत असल्याचे प्रकार समोर आले होते. इतकेच नव्हे तर, गाभाऱ्यातही हे पुजारी मनमानी पद्धतीने वागत असल्याचे आढळून आले होते. या गंभीर प्रकारांची दखल घेत मंदिर संस्थानाने अशा दोषी पुजाऱ्यांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले होते. मात्र, ज्या पुजाऱ्यांचे स्पष्टीकरण समाधानकारक नव्हते, त्यांच्यावर कडक कारवाई करत मंदिरप्रवेशबंदीची शिक्षा सुनावण्यात आली.
निजामकालीन कायद्याचा आधार
विशेष म्हणजे, ही कारवाई सुमारे ११६ वर्षे जुन्या, म्हणजेच निजामकालीन १९०९ च्या ‘देऊळ कवायत’ कायद्यातील कलम २४ आणि २९ नुसार करण्यात आली आहे. या कायद्यानुसार मंदिरातील चालीरीती आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार मंदिर संस्थानाला आहे. गेल्या सहा महिन्यांत अनेक पुजाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या आणि त्यापैकी १२ जणांवर मंदिरप्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे.
‘या’ पुजाऱ्यांवर झाली कारवाई (कंसात बंदीचा कालावधी):
- ओंकार हेमंत इंगळे (एक महिना)
- अभिजीत माधवराव कुतवळ (एक महिना)
- श्रीधर विनायक क्षीरसागर (१५ दिवस)
- अक्षय किशोर कदम (१५ दिवस)
- महेश भारत रोचकरी (१५ दिवस)
- अजय संजय शिंदे (१५ दिवस)
- सुदर्शन यशवंत वाघमारे (६ महिने)
- रणजीत अविनाश साळुंके (२ महिने)
- अमित दत्तात्रय तेलंग (१ महिना)
- नानासाहेब जगन्नाथ चोपदार (१ महिना)
- तुषार विजयकुमार वेदे (३ महिने)
- प्रदीप विलास मोटे (३ महिने)
या कारवाईमुळे तुळजापूर मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसेल आणि सामान्य भाविकांना सुलभ दर्शन घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मंदिर संस्थानाच्या या धडक कारवाईचे भाविकांमधून स्वागत होत आहे.