तुळजापूर: आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या मुंबईतील महिलांनी अडीच लाखांचे दागिने चोरणाऱ्या दोन चोरट्या महिलांना स्वतःच्या धाडसाने आणि सीसीटीव्हीच्या मदतीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, या महिलांच्या तत्परतेचे कौतुक करण्याऐवजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यासाठी त्यांना तब्बल आठ तास ताटकळत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपाशीपोटी पोलीस ठाण्यात बसून राहिलेल्या या महिलांचा अखेर संयम सुटला आणि त्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संजोता बाळासाहेब बेडक्याळे (वय ४० वर्षे, रा. अजिंक्यतारा सोसायटी, चेंबूर, मुंबई) आणि त्यांच्या पाच मैत्रिणी मंगळवारी तुळजापुरात देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. गर्दीत चोरी होऊ नये या खबरदारीपोटी त्यांनी आपल्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने (किंमत सुमारे अडीच लाख रुपये) पर्समध्ये काढून ठेवले होते. मंदिरात प्रवेश करण्यासाठी त्या शहाजीराजे महाद्वाराजवळ आल्या असता, दोन चोरट्या महिलांनी त्यांच्यावर पाळत ठेवली आणि गर्दीचा फायदा घेत पर्सची चेन उघडून दागिने लांबवले.
ही बाब संजोता बाळासाहेब बेडक्याळे यांच्या मैत्रिणीच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ आरडाओरड न करता प्रसंगावधान राखले. त्यांनी थेट मंदिर समितीचे कार्यालय गाठले आणि तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती केली. फुटेजमध्ये दोन संशयित महिला दागिने चोरताना स्पष्ट दिसल्या. त्यानंतर या महिलांनी स्वतः मंदिरात शोध मोहीम राबवली आणि त्या दोन चोरट्या महिलांना मंदिरातील होमाजवळ रंगेहाथ पकडले.
पोलिसांच्या कारभारावर संताप
दुपारी साडेबारा वाजता चोरट्या महिलांना पकडून पोलीस ठाण्यात आणल्यानंतर, पोलिसांनी तासाभरात तक्रार नोंदवून घेतो असे सांगितले. मात्र, दुपारचे १ वाजल्यापासून ते रात्रीचे ८ वाजेपर्यंत या भाविक महिलांना पोलीस ठाण्यातच बसवून ठेवण्यात आले. सकाळपासून उपाशी असलेल्या या महिलांचा अखेर ८ वाजता संयम सुटला (बांध फुटला) आणि त्यांनी पोलीस ठाण्यातच आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. महिलांनी ‘राडा’ करताच पोलिसांनी तातडीने हालचाली करत गुन्हा दाखल करून घेतला आणि पर्समधील चोरीला गेलेले दागिने परत मिळवून दिले.
याप्रकरणी संजोता बेडक्याळे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संशयित आरोपी स्नेहा हिरेमन सुकळे (वय २५ वर्षे) आणि निलाबाई शिवराम शिंदे (वय ५५ वर्षे, दोघी रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) या दोन चोर महिलांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
दिवसभर मनस्ताप सहन केल्यानंतर, रात्री उशिरा या महिलांनी पुन्हा मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले आणि रात्री ११ वाजता त्या मुंबईकडे रवाना झाल्या. भाविकांनी स्वतः गुन्हेगार पकडून देऊनही पोलिसांच्या या वेळखाऊ धोरणामुळे संताप व्यक्त केला जात आहे.






