तुळजापूर: “माझ्या लेकराला वाचव, आई तुळजाभवानी,” असा आर्त टाहो फोडत, पायात त्राण नसतानाही एक आई आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी मंदिराच्या दिशेने धावत होती. एकीकडे उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर चिमुकल्याचे प्राण वाचवण्यासाठी धडपडत होते, तर दुसरीकडे आईने देवीच्या चरणी दंडवत घालून पदर पसरला होता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आई मंदिरात पोहोचली, तोवर डॉक्टरांनी अडीच वर्षांच्या समर्थला मृत घोषित केले होते आणि चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
तुळजापूर तालुक्यातील हंगरगा तुळ येथील चव्हाण वस्तीवर गुरुवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. समर्थचे वडील, बालाजी चव्हाण, नेहमीप्रमाणे कामावर गेले होते आणि आई व आजी जवळच्या शेतात काम करत होत्या. अडीच वर्षांचा समर्थ आपल्या दोन लहान बहिणींसोबत घराबाहेर खेळण्यात दंग होता. खेळता खेळता त्याचा तोल गेला आणि तो घराजवळील जनावरांच्या पाण्याच्या हौदात पडला. रस्त्याच्या कामामुळे हा हौद जमिनीलगत आला होता, ज्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.
सोबतच्या लहानग्यांनी आरडाओरड करताच आई धावत आली. क्षणाचाही विलंब न लावता तिने समर्थला बाहेर काढले आणि तातडीने तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. डॉक्टर आपल्या मुलावर उपचार करत असताना, त्या माऊलीचा धीर सुटला. “माझ्या बाळाला वाचव,” अशी आर्त विनवणी करत ती थेट तुळजाभवानी मंदिराकडे धावली. सुमारे एक किलोमीटरचे अंतर धावत जाऊन, तिने मंदिराच्या महाद्वारात दंडवत घातला आणि देवीसमोर पदर पसरून आपल्या लेकरासाठी जीवदान मागितले.
मात्र, तिची प्रार्थना देवापर्यंत पोहोचण्याआधीच काळाने घाला घातला. डॉक्टरांनी समर्थला मृत घोषित केल्याची बातमी येताच, त्या आईने मंदिराच्या दारातच हंबरडा फोडला. तिचा तो आक्रोश पाहून उपस्थित नातेवाईक आणि नागरिकांच्याही डोळ्यात पाणी आले. दुसरीकडे, मुलगा फक्त हौदात पडला आहे असे सांगून बोलावलेले वडील बालाजी चव्हाण रुग्णालयात पोहोचले आणि समर्थचा निष्प्राण देह पाहून त्यांनी फोडलेला टाहो सर्वांचे काळीज चिरून गेला.
समर्थच्या अकाली जाण्याने चव्हाण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दोन दिवसांपूर्वीच आजोळहून परतलेल्या समर्थच्या मृत्यूने संपूर्ण गावावर आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नियतीच्या या क्रूर खेळापुढे सर्वांनीच हात टेकले होते.