तुळजापूर – शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर येथे अन्न व औषध प्रशासन विभाग सध्या मिशन मोडवर काम करून कारवाई करत आहे.भाविकांना स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावे या हेतूने हॉटेल धाबे आणि स्वीट होम या ठिकाणी पदार्थांचे नमुने घेण्यासाठी तसेच दूषित आढळल्यास कारवाईकरण्यासाठी इतर जिल्ह्यातील अन्न सुरक्षा अधिकारी बोलाविण्यात आले आहेत.16 ऑक्टोबर रोजी तुळजापूर शहरातील एकूण 31 अन्न आस्थापना हॉटेल,स्विट मार्ट,नमकीन/फराळ उत्पादक व विक्रेते,खवा व पेढा विक्रेते,किरकोळ व घाऊक अन्न व्यवसायिक यांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या.
आज 17 ऑक्टोबर रोजी तुळजापूर शहरातील एकूण 39 अन्न आस्थापना हॉटेल,स्विट मार्ट, नमकीन/फराळ उत्पादक व विक्रेते, खवा व पेढा विक्रेते यांच्या तपासण्या करण्यात आल्या. विना परवाना व्यवसाय करणाऱ्या एकूण 9 अन्न व्यवसायिकाना नोटीस देवून परवाना घेईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.तसेच 7 ठिकाणी टिपीसी मीटरद्वारे खाद्यतेलाचे नमुने तपासले असता त्याचे रिडिंग 25 पेक्षा कमी आले आहे.तसेच आज पेढयाचे 4 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहे. एका ठिकाणी अस्वच्छ जागेत पेढा साठविल्याचे आढळून आल्याने 20 किलो पेढा, 3 हजार रुपये किमतीचा साठा नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सु.जि.मंडलिक,स.वि.कनकावाड व ऋ.र.मरेवार यांनी केली.
भाविक भक्तांनी अन्न पदार्थाच्या दर्जाबाबत तक्रार असल्यास या कार्यालयाला माहिती देवून सहकार्य करावे. जेणे करून संबंधिताविरुद्ध त्वरित कारवाई करणे शक्य होईल. असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त शि.बा.कोडगिरे यांनी केले आहे.
विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या चार व्यवसायिकांना परवाना घेईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश
श्री. तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव 15 ते 30 ऑक्टोबर या कालावधीमध्ये तुळजापूर येथे साजरा होत आहे.1 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत तुळजापूर शहरातील एकूण 31 अन्न आस्थापना हॉटेल, स्वीट मार्ट,नमकीन/ फराळ उत्पादक व विक्रेते खवा व पेढा विक्रेते, किरकोळ व घाऊक अन्न व्यावसायिक यांच्या तपासण्या करण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाचे भरारी पथके करीत आहे.
विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या 4 अन्न आस्थापना व्यवसायिकांना नोटीस देऊन परवाना घेईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. एक स्वीट मार्ट विक्रेत्याने युज बिफोर डेटचा बोर्ड न लावल्यामुळे त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.तसेच या कालावधीमध्ये भगर, साबुदाणा,तेल,पेढे,लाडू,खवा तयार अन्नपदार्थ अशा विविध अन्नपदार्थाचे एकूण 17 नमुने घेण्यात आले आहे. हे नमुने अन्न विश्लेषक यांच्याकडे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहे.विश्लेषण अहवाल प्राप्त होतात अन्न सुरक्षा कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
ग्राहकांनी भगरपीठ खरेदी, सेवन करताना परवानाधारक व नोंदणीधारक अन्न व्यवसायिकांकडून खरेदी करावे. बंद पॅकेटवर बॅच नंबर उत्पादकांची नावे बेस्ट बिफोर युज/एक्सपायरी डेट या बाबींची खात्री करूनच खरेदी करावे.खुल्या बाजारातून हातगाड्यावरून भगर विकत घेऊ नये. तसेच स्वच्छ करून त्यानंतर घरगुती पद्धतीने स्वत: घरीच तयार करून सेवन करावे.
ग्राहकांनी बाजारातून किंवा किराणा दुकानातून तयार भगर पीठ किंवा उपवास पीठ याचे सेवन करू नये. खरेदी केलेल्या भगरीचे पक्के खरेदी बिल्डर घ्यावे.भगर पिठापासून तयार केलेली भाकरी ही पूर्णपणे भाजलेली आहे याची खात्री करूनच सेवन करावे. आवश्यक तेवढी भगर तयार करून त्याचे सेवन करावे. शिळी भगरीचे सेवन होणार नाही याची दक्षता घ्यावी. भगरीला बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे विषबाधा होण्याचा धोका वाढतो.तरी भगर साठवितांना हवाबंद डब्यामध्ये साठवण्यात यावी. ती स्वच्छ व कोरड्या वातावरणात ठेवावी.अशाप्रकारे ग्राहकांनी स्वच्छ व सुरक्षित अन्न पदार्थ सेवन करण्याच्या दृष्टीने या सूचनांचे पालन करावे व अन्न व औषध प्रशासन विभागाला सहकार्य करावे. असे आवाहन सहायक आयुक्त एस.बी.कोडगिरे यांनी केले आहे.