धाराशिव – जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघाच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारीच्या प्रश्नावर तणाव वाढताना दिसत आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील उमेदवारांच्या इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्षांतर्गत संघर्ष उभा राहिला आहे.
तुळजापूर मतदारसंघावर महाविकास आघाडीतून कोणाचा हक्क राहील, हे अद्याप स्पष्ट नाही. या मतदारसंघातून चार वेळा निवडून आलेले आणि मागील निवडणुकीत पराभूत झालेले माजी मंत्री मधुकराव चव्हाण पुन्हा एकदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरू इच्छित आहेत. याचबरोबर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील आणि अणदूरचे सरपंच राम दादा आलुरे हे देखील उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून नळदुर्गचे उद्योगपती अशोक जगदाळे यांचे नाव पुढे येत आहे. मात्र, त्यांची उमेदवारी निश्चित होण्याआधीच पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष जीवनराव गोरे आणि तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीचा तीव्र विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे, जीवनराव गोरे स्वतः तुळजापूर मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे येत्या 14ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यानिमित्त तुळजापुरात आयोजित बैठकीत अशोक जगदाळे आणि तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यात हमरीतुमरी झाल्याचे कळते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यात सध्या दोन गट पडले आहेत – अजित पवार गट आणि शरद पवार गट. धाराशिव जिल्ह्यात शरद पवार गटाची ताकद कमी असल्याने या गटातील उमेदवारीसाठी होणाऱ्या संघर्षाचे परिणाम पुढील काळात दिसून येऊ शकतात. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच या गटामध्ये उमेदवारीसाठी सुरू असलेल्या रडगाण्यामुळे पक्षाची प्रतिमा प्रभावित होण्याची शक्यता आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातील उमेदवारीच्या संघर्षामुळे आगामी निवडणुकीसाठी मोठा राजकीय रणसंग्राम उभा राहण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार आणि पक्षांतर्गत मतभेदांचे काय परिणाम होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.