तुळजापूर – तुळजापूर शहरात रस्त्याच्या कामावरून सुरू असलेल्या वादाने हिंसक वळण घेतले आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या ( पिटू गंगणे – ऋषी मगर ) कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या तुंबळ हाणामारीत चक्क तलवारी आणि चाकूंचा वापर करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या संघर्षात गोळीबार झाल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
गोलाई चौकातील पंचायत समिती येथील रस्त्याच्या कामावरून भाजपचे उमेदवार पिंटू गंगणे आणि मविआचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यात सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. मात्र, या वादाचे रूपांतर लवकरच रक्तरंजित संघर्षात झाले. दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांवरहल्ला चढवला.


या जीवघेण्या हल्ल्यात काँग्रेसचे उमेदवार अमर मगर यांचे पुतणे कुलदीप मगर हे गंभीर जखमी झाले आहेत.कुलदीप मगर यांच्या मानेवर चाकूने, कोयत्याने वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी त्यांना तातडीने सोलापूर येथे हलवण्यात आले आहे.
परिस्थिती इतकी चिघळली होती की, भाजपचे उमेदवार पिंटू गंगणे यांच्या भाच्याने गोळीबार केल्याचा आरोप होत आहे. सुदैवाने, या गोळीबारात कुणीही जखमी झालेले नाही, परंतु भररस्त्यात गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


तुळजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल येत्या २१ डिसेंबर रोजी लागणार आहे. मात्र, निकालाला काही दिवस बाकी असतानाच हा राडा झाल्याने शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
या घटनेनंतर धाराशिव-सोलापूर रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली असून, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल होण्याची शक्यता असून, शहरात तणावपूर्ण शांतता आहे.






