तुळजापूर – आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत यात्रा मैदानासाठी आरक्षित सात एकर जागा… आणि त्या जागेचा खेळखंडोबा! 1989 साली शासनाने ही जागा यात्रा मैदानासाठी राखीव ठेवली, 12 लाख मंजूर केले, 3.48 लाख भरपाई दिली. पण पुढे काय? सत्तेच्या खुर्चीवर बसताच ठराव बदलला, फेरफार गायब झाले आणि डुप्लिकेट पीआर कार्ड तयार झालं!
नगराध्यक्ष पदाचा सुवर्णसंधी साधत एका माजी नगराध्यक्षाने शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन हडपण्याचा मास्टर प्लॅन राबवला. परिणामी, आज सात एकर जागेपैकी फक्त तीन एकर मोकळी, बाकीच्या जागेवर उभ्या आहेत बिल्डिंगच्या भिंती!
हे सर्व बघून नागरिक चिडले, रस्त्यावर उतरले, उपोषण सुरू केलं. पण सत्ता आणि प्रशासन बहिरे झाले की काय? बुधवारी पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव दौऱ्यावर आले. परिवहन मंत्री असल्याने त्यांनी सोलापूर ते धाराशिव एसटी प्रवास करून बेक्कार व्यवस्थेचा अनुभव घेतला. त्यांचं वाहन तुळजापुरात पोहोचताच काही महिलांनी त्यांना यात्रा मैदानची जागा मोकळी करण्याचं निवेदन दिलं.
पालकमंत्र्यांनी लगेच आदेश दिले – “एका महिन्यात अहवाल द्या!” पण आता खरा प्रश्न हा आहे, हा अहवाल फक्त फाईलमधं राहणार की खरंच कारवाई होणार?
सरकारला आणि प्रशासनाला खडसावण्याची वेळ आली आहे. यात्रा मैदानाची जमीन गिळंकृत करणाऱ्यांवर कारवाई होणार की पुन्हा सामान्य जनतेलाच झुलवत ठेवणार? जनतेने हा प्रश्न विचारायलाच हवा!
Video