तुळजापूर – येथील मलबा कॉर्नर परिसरातील दुर्वा वडापाव दुकानासमोर १६ मे रोजी रात्री एका १८ वर्षीय तरुणाला, चुळ भरलेले पाणी अंगावर पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून तिघांनी मिळून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी २० मे रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेम लाल पवार (वय १८ वर्षे, रा. धाकटा तुळजापूर, ता. तुळजापूर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, बप्पा रुपनर, पिन्टु रुपनर आणि अन्य एक अनोळखी इसम (सर्व रा. तुळजापूर) यांनी १६ मे २०२५ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही मारहाण केली.
फिर्यादीनुसार, घटनेच्या वेळी प्रेम पवार हे मलबा कॉर्नर येथील दुर्वा वडापाव दुकानासमोर थांबले होते. त्यावेळी आरोपींनी, त्यांच्यापैकी कोणीतरी चुळ भरल्याचे पाणी प्रेम पवार यांच्या अंगावर पडल्याचे कारण पुढे करत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी प्रेम पवार यांना लाथाबुक्यांनी तसेच पिवळ्या रंगाच्या पाईपने मारहाण करून जखमी केले. यावेळी त्यांना जिवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी प्रेम पवार यांनी २० मे रोजी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.