तुळजापूर : तालुक्यातील मंगरूळ येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका २५ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉडने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी वैभव विजय बचाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव विजय बचाटे (वय २५, रा. मंगरूळ) हे १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मंगरूळ बसस्थानक चौकातील मारुती मंदिराजवळ होते. यावेळी आरोपी बिभिषण दिलीप धुरगुडे आणि आनंद भीम धुरगुडे (दोघे रा. मंगरूळ) यांनी त्यांना अडवले. मागील भांडणाच्या कारणावरून आरोपींनी वैभव यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर वैभव बचाटे यांनी १५ सप्टेंबर रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.