तुळजापूर : तुळजापूर येथील ६५ वर्षीय चित्रा पाटील यांच्या हत्येप्रकरणी एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी माहिती समोर आली आहे. ज्या तरुणाला चित्रा पाटील यांनी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले, खाऊ-पिऊ घातले, त्याच तरुणाने सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी त्यांची गळा दाबून हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे उपकाराची परतफेड क्रूरपणे करणाऱ्या आरोपी ओम निकम (वय २१) याच्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मृत चित्राताई पाटील यांचे पुत्र संग्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चित्राताई यांच्या गळ्यात नेहमी दीड तोळ्याचे गंठण आणि पाटल्या असे मिळून सुमारे १५ ते १६ तोळे सोन्याचे दागिने असायचे. शेजारी राहणारा आरोपी ओम निकम याचे त्यांच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. चित्राताई त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे जीव लावत असत.
१८ जुलै रोजी, ओमच्या फोननंतर चित्राताई त्याच्यासोबत घरातून बाहेर गेल्या होत्या, अशी माहिती संग्राम पाटील यांच्या पत्नीने त्यांना दिली. रात्री उशिरापर्यंत त्या घरी न परतल्याने संग्राम यांनी ओमला अनेकदा फोन केले, मात्र त्याने चित्राताई आपल्यासोबत नसल्याचे सांगितले. अखेरीस, शोधाशोध करूनही त्या न सापडल्याने बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली.
तपासादरम्यान, सोलापूर-लातूर बायपासवरील नळदुर्ग रोडच्या पुलाखाली चित्राताई यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या अंगावरील सर्व सोन्याचे दागिने गायब होते. पोलिसांनी संशयावरून ओम निकमला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
विश्वासाचा गळा घोटला
ओमने चित्राताई यांचा विश्वासघात करून त्यांना घराबाहेर नेले, त्यांचा गळा दाबून खून केला आणि अंगावरील सर्व दागिने लुटून नेले. ज्या माऊलीने आईसारखा आधार दिला, तिच्याच जीवावर उठलेल्या या नराधमाच्या कृत्याने तुळजापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी संग्राम पाटील यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपी ओम निकम विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.