तुळजापूर – शहरातील नळदुर्ग रोडवर असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीच्या हातातील दहा हजार रुपयांची रोकड एका तरुणाने हिसकावून पळ काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ महादेव देवकर (वय ३८, रा. वासुदेव गल्ली, तुळजापूर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ते बुधवार, दि. १६ जुलै रोजी रात्री १०:४० च्या सुमारास एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी गेले होते.
एटीएमच्या बाहेर उभे राहून ते १०,००० रुपयांची रोकड मोजत असताना, आरोपी राहुल विश्वनाथ शिंदे (वय २१, रा. खोताचीवाडी, ता. तुळजापूर) याने अचानक त्यांच्या हातातील रक्कम हिसकावली आणि तेथून पळ काढला.
या घटनेनंतर सोमनाथ देवकर यांनी गुरुवारी, १७ जुलै रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राहुल शिंदे याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भररस्त्यावर रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.