लोहारा: लोहारा पोलिसांनी मंगळवारी रात्री जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. साजिद आमीर खुटेपड (३०, रा. लोहारा) आणि आमिन कुरेशी (रा. लोहारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिकअप गाडी (क्र. एमएच ४३ बीबी १६९५) मध्ये चार जर्सी गायी दाटीवाटीने बांधून त्यांची बेकायदेशीर वाहतूक केली जात होती. जनावरांना चारा आणि पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. ही वाहतूक जनावरांच्या कत्तलीसाठी केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.
माकणी येथील सरस्वती विद्यालयासमोर ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या जनावरांची आणि वाहनाची किंमत ५ लाख रुपये असल्याचा अंदाज आहे.
आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१) (ड), ११ (१) (ई), ११(१) (एच) आणि ११९ सह भादंवि कलम ४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.