तुळजापूर: तालुक्यात अवैध आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली असून, दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तामलवाडी आणि नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी पानमसाला, सिगारेट आणि तंबाखूचा साठा जप्त केला आहे.
पहिल्या घटनेत, तामलवाडी पोलिसांनी सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरील टोलनाक्यासमोर ही कारवाई केली. दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७:२० वाजण्याच्या सुमारास शिवनेरी हॉटेलजवळ मल्लिनाथ तिपन्ना कोळी (वय ४२, रा. उळेगाव, दक्षिण सोलापूर) हा केसरयुक्त विमल पान मसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडून ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी त्याच्यावर सिगारेट व इतर तंबाखू उत्पादन अधिनियम २००३ अन्वये तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत, नळदुर्ग पोलिसांनी तालुक्यातील किळज गावात कारवाई केली. दि. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सिध्देश्वर विद्यालयासमोर आयुब जाफर शेख (वय ४८, रा. किळज) हा तंबाखू, सिगारेट आणि विडी यांसारख्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ५५० रुपये किमतीचा साठा जप्त केला. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही कारवायांमुळे तालुक्यातील अवैध तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.