धाराशिव: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर असून, त्यांचा ‘दगाबाज रे’ हा संवाद दौरा चांगलाच गाजत आहे. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची जुनी ऑडिओ क्लिप ऐकवत, “सातबारा कोरा कोरा म्हणणारा कुठे गेला रे चोरा?” असा घणाघाती सवाल त्यांनी केला.
गेल्या दोन महिन्यांत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे, विशेषतः मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने जाहीर केलेल्या ३२ हजार कोटींच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का, याचा आढावा घेण्यासाठी ठाकरे हा दौरा करत आहेत.


‘तो’ ऑडिओ क्लिपचा ‘बाण’
करजखेडा येथील शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच शेतकऱ्यांना धीर दिला. “मी तुम्हाला हिम्मत द्यायला आलोय. तुमच्या आशीर्वादाने मी कर्जमाफी केली होती,” असे ते म्हणाले.
यावेळी ठाकरे यांनी शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांची विधानसभा निवडणुकीपूर्वीची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा ‘सातबारा कोरा’ करण्याचे आश्वासन दिले होते. ही क्लिप ऐकवल्यानंतर ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत टीकास्त्र सोडले. “आधी म्हणाले सातबारा करणार कोरा कोरा… कुठे गेला रे चोरा? मतचोरा! कर्जमाफी करा हा काय टोमणा आहे का? मुख्यमंत्री म्हणतात उद्धव ठाकरे टोमणा मारतात. मग लाडक्या बहिणींना पैसे मिळाले की नाही, ते विचारत होते त्याचं काय?” असा सवाल त्यांनी केला.
“शेतकरी मेला तरी चालेल, विकास झाला पाहिजे, कॉन्ट्रॅक्टर जगला पाहिजे,” अशी या सरकारची नीती असल्याची टीकाही त्यांनी केली.
‘घरी बसून महाराष्ट्र वाचवला’


आपल्यावर होणाऱ्या ‘घरी बसून’ टीकेलाही त्यांनी सडेतोड उत्तर दिले. “मला म्हणतात उद्धव ठाकरेंनी आता घर सोडले. यांनी स्वतःच्या घराकडे लक्ष द्यावे. दिल्लीत यांना मुजरा करावा लागतो. होय, मी घरी बसून माझा महाराष्ट्र वाचवला. मी घरी बसून कर्जमुक्ती केली. तुम्ही फिरून सुद्धा शेतकरी तुमच्याविरुद्ध चिडला आहे. तुम्हाला का शिव्या घालत आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
‘आनंदाचा शिधा’ आणि ‘शिव भोजन’ बंद करून ‘यांची दुकानं’ सुरू असल्याचा आरोप करत, त्यांनी सरकारला ‘बाजार बुणगे’ संबोधले.
‘कर्जमाफी होईपर्यंत मत देऊ नका’
ठाकरे यांनी यावेळी अजित पवार यांच्या जुन्या भाषणाची क्लिपही ऐकवली, ज्यात ‘पीक कर्जाचे पैसे ३१ तारखेच्या आत भरा’ असे आवाहन करण्यात आले होते. “ही खोटी, निर्दयी माणसं आहेत, यांना पाझर फुटणार नाही,” अशी टीका त्यांनी केली.
“जोपर्यंत कर्ज माफ होत नाही आणि हेक्टरी ५० हजार रुपये पीक विमा मिळत नाही, तोपर्यंत महायुतीला मत नाही, असा निर्धार करा!” असे कळकळीचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
ठळक मुद्दे:
- ‘दगाबाज रे’ दौऱ्यानिमित्त उद्धव ठाकरे धाराशिव जिल्ह्यात; करजखेडा येथे शेतकऱ्यांशी संवाद.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जुनी ऑडिओ क्लिप ऐकवत जोरदार हल्लाबोल.
- “सातबारा कोरा कोरा म्हणणारा कुठे गेला रे चोरा?” ठाकरेंचा खोचक सवाल.
- कर्जमाफी आणि पीक विमा मिळेपर्यंत महायुतीला मत न देण्याचे शेतकऱ्यांना आवाहन.





