तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी शिवारात शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांना शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात तामलवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच, सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी संबंधित व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सीआरपीसी कलम १२६ अंतर्गत कार्यवाही करावी, अशी मागणी पोलिसांनी तुळजापूर तहसीलदारांकडे केली आहे.
याबाबत तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी. आर. टेकाळे यांनी तुळजापूरच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, पोलीस कॉन्स्टेबल अतुल संपत जाधव (वय २९, रा. कोंबडवाडी ) यांनी फिर्याद दिली आहे. दि. १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पोकॉ. जाधव हे राज्य पाेलिस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर व चालक नितीन सरवदे यांच्यासह यमगरवाडी शिवारातील पाझर तलावाकडे जात होते. यावेळी त्यांना रस्ता अडवलेला दिसला. चौकशी केली असता, सोमनाथ जीवन वाघमोडे (रा. यमगरवाडी) यांनी हा रस्ता अडवल्याचे समजले.
अधिकाऱ्यांनी वाघमोडे यांना फोनवरून विचारणा केली असता, त्यांनी उलट “तुम्ही कोण विचारणार? हा रस्ता माझा आहे,” असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर घटनास्थळी येऊन त्यांनी फिर्यादी पोकॉ. जाधव व मिटकर यांना पुन्हा शिवीगाळ करत “तुम्ही मला काय करता बघतो,” अशी धमकी दिली. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि धमकी दिल्याबद्दल सोमनाथ जीवन वाघमोडे यांच्याविरोधात तामलवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद क्र. ३०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २११ (सार्वजनिक उपद्रव), ३५१ (हल्ला), ३५२(१)(२) (गंभीर चिथावणीशिवाय हल्ला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे गावात तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे सोमनाथ जीवन वाघमोडे यांच्याकडून सार्वजनिक शांतता भंग पावू नये, यासाठी त्यांच्याकडून दीड महिन्याच्या मुदतीसाठी जातमुचलका (जामीन/बंधपत्र) घ्यावे आणि सीआरपीसी कलम १२६ व १३५(३) अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी विनंती पोलिसांनी केली आहे. यासाठी वाघमारे यांना समन्स बजावण्याची मागणीही करण्यात आली आहे.
उमाकांत मिटकर हे राज्य पाेलिस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य असताना तसेच त्यांचा अंगरक्षक पोलीस असताना तामलवाडी पोलिसांनी हे प्रकरण कोर्टात न पाठवता तहसीलदार यांच्या दरबारात पाठवले आहे तसेच शासकीय कामात अडथळा हे कलम लावले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.