उमरगा :उमरगा येथील खळबळजनक अभिषेक कालिदास शिंदे खून प्रकरणाचा उलगडा करण्यात उमरगा पोलिसांना यश आले आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून अभिषेकच्याच दोन मित्रांनी त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत मोबाईल सीडीआर आणि गुगल मॅपच्या टाईमलाईनचा वापर करून दोन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. अक्षय राजाराम सारोळे (वय २२, रा. बँक कॉलनी, उमरगा) आणि संदीप मधुकर लोहार (वय २४, रा. सुविधा हॉस्पिटलमागे, उमरगा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
घटनेची पार्श्वभूमी
उमरगा येथील रहिवासी अभिषेक कालिदास शिंदे (वय २३) हा दिनांक २४ जुलै २०२५ पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याचे वडील कालिदास शिंदे यांनी २५ जुलै रोजी उमरगा पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी हरवल्याची नोंद करून तपास सुरू केला होता. त्याच दिवशी सायंकाळी, उमरगा शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ बायपासलगतच्या एका खड्ड्यात अभिषेकचा मृतदेह आढळून आला.
तपासाची चक्रे
सुरुवातीला या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात धारदार शस्त्राने झालेल्या जखमांमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने, ९ ऑगस्ट रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत तीन महिलांवर संशय व्यक्त केल्याने, पोलिसांनी त्यांना अटक करून चौकशी केली. चौकशीदरम्यान, मयत अभिषेक हा त्यापैकी एका महिलेसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होता आणि दारू पिऊन तिला त्रास देत असल्याचे समोर आले.
तांत्रिक तपासाने आरोपी गजाआड
या तपासात पोलिसांना एका साक्षीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. अक्षय सारोळे याने ‘मी अभिषेकला मारून टाकले आहे’ असे फोनवर सांगितल्याचे साक्षीदाराने पोलिसांना सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अक्षय सारोळेला ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलचे सीडीआर आणि गुगल मॅपमधील टाईमलाईन तपासली असता, घटनेच्या वेळी त्याचे लोकेशन घटनास्थळावरच असल्याचे सिद्ध झाले.
पोलिसांनी खाक्या दाखवताच अक्षयने गुन्ह्याची कबुली दिली आणि आपला मित्र संदीप लोहार याच्या मदतीने खून केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे संदीप लोहारला कोल्हापूर येथील कागल एमआयडीसीमधून अटक केली.
खुनाचा खुलासा
आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, २४ जुलै रोजी अक्षय, संदीप आणि मयत अभिषेक हे तिघे मिळून एका बारमध्ये दारू पीत होते. यावेळी अभिषेकने दोघांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याचा राग आल्याने दोघांनी अभिषेकला दारू पाजून स्कुटीवर बसवून घटनास्थळी नेले आणि धारदार दगडाने डोक्यात, गळ्यावर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह खड्ड्यात फेकून ते तुळजापूर, सोलापूरमार्गे कोल्हापूरला पळून गेले होते.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि श्रीकांत भराटे करीत आहेत.