उमरगा – तालुक्यातील कसगीवाडी येथे मागील भांडणाच्या कारणावरून एका युवकावर चार जणांनी हल्ला केला. लोखंडी रॉड आणि बॅटने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. उमरगा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दि. 22 मार्च 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता महात्मा बसवेश्वर चौक, कसगी येथे ही घटना घडली. मल्लिकार्जुन शरणाप्पा कोळनुरे (वय 31 वर्षे, रा. कसगी, ता. उमरगा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अर्जुन लवटे, आकाश टकले, बिरु माशाळे आणि राजेंद्र माशाळे (सर्व रा. कसगीवाडी) यांनी मागील भांडणाचा वचपा काढण्यासाठी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड आणि बॅटने मारहाण केली.
हल्ला केल्यानंतर आरोपींनी मल्लिकार्जुन कोळनुरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर जखमी अवस्थेत मल्लिकार्जुन यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास उमरगा पोलीस करीत आहेत.