उमरगा : आयकर माफीची सवलत मिळवून देण्याच्या आणि कारवाईची भीती दाखवून एका कंपनी मॅनेजरची तब्बल १९ लाख ३० हजार ६६४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उमरग्यात उघडकीस आला आहे. ही घटना २६ डिसेंबर २०२४ ते २ एप्रिल २०२५ या कालावधीत घडली असून, याप्रकरणी पीडित मॅनेजरने दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी स्वतःला एका खाजगी लिमिटेड कंपनीचे अधिकारी आणि आयकर अधिकारी असल्याचे भासवले होते.
फिर्यादी मुरलीधर भाऊराव भोसले (वय ६३ वर्षे, रा. मलंग प्लॉट, एकोंडी रोड, उमरगा) हे त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या ‘सविता सॉफ्टवेअर (ओपीसी) प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, उमरगा’ येथे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आरोपी भगीरथी (बी.डी.ई, मोबाईल क्र. ८६५५६४९५२७), विष्णू गुर्जर (शाखा व्यवस्थापक) आणि आदित्य खंडेलवाल (आयकर अधिकारी) – सर्वजण कथितरित्या ॲकोलायटी टेक्नॉलिजीस्ट प्रायव्हेट लिमिटेड, जयपूर, राजस्थान येथील असल्याचे सांगण्यात आले .
आरोपींनी मुरलीधर भोसले यांना त्यांच्या कंपनीला आयकर माफीची सवलत मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तसेच, जर ही सवलत मिळवली नाही, तर आयकर विभाग त्यांच्या कंपनीवर कारवाई करेल व कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये जाईल, अशी भीती दाखवली. आयकर माफीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ‘कन्सल्टन्सी फी’ म्हणून आरोपींनी फिर्यादी भोसले यांच्याकडून एस.बी.आय. बँक, उमरगा येथील खात्यावरून एकूण १९ लाख ३० हजार ६६४ रुपये उकळले.
बराच काळ उलटूनही आयकर माफीचे प्रमाणपत्र न मिळाल्याने आणि दिलेला पैसाही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे मुरलीधर भोसले यांच्या लक्षात आले. त्यांनी १६ मे २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
फिर्यादी मुरलीधर भोसले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून, उमरगा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) (फौजदारी विश्वासघात), ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.