उमरगा – उमरगा शहरात पोलिसांचे बनावट ओळखपत्र दाखवून एका ज्येष्ठ महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘या परिसरात एका महिलेचा खून झाला आहे, तुम्ही एवढे सोने घालून फिरू नका,’ असे घाबरवून चोरट्यांनी महिलेच्या नकळत तिच्या पर्समधून तब्बल साडेआठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास मुगळे हॉस्पिटलजवळ घडली.
याप्रकरणी क्रांती भगवान कांबळे (वय ५६, रा. मूकबधिर शाळेजवळ, माने नगर, उमरगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रांती कांबळे या शुक्रवारी सायंकाळी मुगळे हॉस्पिटलच्या कंपाऊंड वॉलजवळून जात होत्या. यावेळी अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. ‘हम पोलीस वाले है,’ असे सांगत त्यांनी बनावट ओळखपत्र दाखवले. ‘इथे एका बाईचा खून झाला आहे. तुमच्या सुरक्षेसाठी आमची इथे ड्युटी लावली आहे, तुम्ही अंगावर एवढे सोने घालू नका,’ असे त्यांनी कांबळे यांना बजावले.
चोरट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कांबळे यांनी आपल्या गळ्यातील गंठण आणि हातातील पाटल्या असे एकूण साडेआठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने काढून आपल्या पर्समध्ये ठेवले. याचवेळी चोरट्यांनी हातचलाखीने त्यांच्या नकळत पर्समधील दागिने काढून घेतले आणि तेथून पसार झाले. काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कांबळे यांनी शनिवारी (दि. २६) उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
क्रांती कांबळे यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी अशा भामट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.