उमरगा : शासनाच्या विविध बांधकाम योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीचा बनावट शिक्का तयार करून त्याआधारे खोटी प्रमाणपत्रे बनवून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उमरगा तालुक्यातील सावळसुर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी लातूर जिल्ह्यातील तीन जणांविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सावळसुर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी विजयानंद नारायण डोणगावे (वय ४७) यांनी २२ जुलै २०२५ रोजी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजयश्री विश्वंभर माळी, आदिमिया अमोल दुधभाते आणि भाग्यश्री दत्तात्रय भोसले (सर्व रा. किल्लारी, ता. औसा, जि. लातूर) यांनी संगनमत करून हा गुन्हा केला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपींनी २४ जून २०२५ पासून सावळसुर ग्रामपंचायत कार्यालयाच्या नावाचा बनावट शिक्का तयार केला. या बनावट शिक्क्याचा वापर करून त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारी ९० दिवसांची बांधकाम मजूर प्रमाणपत्रे बनावट तयार केली. या खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे त्यांनी शासनाची आणि सावळसुर ग्रामपंचायतीची फसवणूक केली.
ग्रामपंचायत अधिकारी विजयानंद डोणगावे यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३६(२), ३४१(२), ३४१(३) आणि ३४१(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणामुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.