उमरगा : संपूर्ण उमरगा शहराला हादरवून सोडणाऱ्या २३ वर्षीय अभिषेक शिंदे हत्याकांडाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, मयत अभिषेक याची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील आरोपी महिला या येरमाळा- चोराखळी येथील एका कलाकेंद्रात नाचकाम करत पुरुषांना जाळ्यात ओढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी २४ आणि २५ जुलैच्या रात्री उमरगा येथील बायपास रोडलगत अभिषेक शिंदे याचा मृतदेह आढळून आला होता. मयत अभिषेकचे वडील कालिदास शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सरोज चिकुंद्रे, रेणु पवार आणि निता जाधव या तीन महिलांवर संगनमत करून खून केल्याचा गुन्हा नोंदवला होता. सुरुवातीला हत्येचे कारण अस्पष्ट असल्याने गूढ निर्माण झाले होते.
मात्र, पोलीस तपासात आता खुनाचे कारण स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधाच्या वादातून ही हत्या घडली. आरोपी महिला या येरमाळा – चोराखळी येथील कुप्रसिद्ध महाकालिका कला केंद्रात नाचकाम करतात आणि पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढतात, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. यासोबतच, मयत अभिषेक शिंदे याच्यावरही पूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे.
उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास वेगाने सुरू आहे. अनैतिक संबंध आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी या दोन्ही बाजूंनी पोलीस पुरावे गोळा करत असून, या कटात आणखी कोणी सामील आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
कलाकेंद्र पुन्हा चर्चेत
विशेष म्हणजे, ज्या महाकालिका कला केंद्रामध्ये या आरोपी महिला काम करतात, त्याच ठिकाणी मागील आठवड्यात दोन गटात मोठी हाणामारी झाली होती. त्यात चार तरुण गंभीर जखमी झाले होते. आता याच कलाकेंद्राशी संबंधित महिलांवर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने येरमाळा परिसरातील हे केंद्र पुन्हा एकदा वादग्रस्त कामकाजामुळे चर्चेत आले आहे.