उमरगा: “इथे राहायचे असेल आणि पेट्रोल पंप चालवायचा असेल तर महिना दीड लाख रुपये हप्ता द्यावा लागेल,” अशी धमकी देत माजी नगरसेवक आणि पेट्रोल पंप मालक वहाब रज्जाक अत्तार यांना मारहाण केल्याप्रकरणी ८ आरोपींविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे उमरगा शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा बायपास रोडवर फिर्यादी वहाब अत्तार यांच्या मालकीचा ‘राजधानी हाथवे सर्विसेस’ नावाचा पेट्रोल पंप आहे. २२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास अत्तार हे पंपावर बसलेले असताना, त्यांच्या ओळखीच्या ओमकार चौधरी याने त्यांना पंपाच्या कोपऱ्यात बोलावून घेतले. तिथे गेल्यानंतर “दादा बोलावत आहेत,” असे ओमकार म्हणाला.
यावेळी शुभम संतोष अंबुलगे याने पुढे येऊन, “जर इथे राहायचे असेल आणि पेट्रोलपंप चालवायचा असेल तर दर महिन्याला दीड लाख रुपये हप्ता द्यावा लागेल, असे आमच्या बॉसचे म्हणणे आहे,” अशी धमकी दिली. अत्तार यांनी ‘कोण बॉस? आणि कशाचे पैसे?’ असे विचारताच, शुभमने त्याच्याजवळील चाकू काढून धाक दाखवला आणि व्यंकट ईराप्पा धोत्रे व आकाश ईराप्पा धोत्रे यांनी पैसे घेण्यासाठी पाठवले असल्याचे सांगितले.
अत्तार यांनी पैसे देण्यास ठाम नकार देताच, शुभम अंबुलगे आणि त्याच्यासोबत आलेल्या साथीदारांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जवळच उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या एर्टिगा गाडीतून तीन ते चार जण उतरले आणि त्यातील एकाने अत्तार यांना पाठीमागून जोराची लाथ मारली, ज्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतर इतर तिघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
यावेळी आरोपींनी अत्तार यांना आणि त्यांच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली व गाडीत बसून निघून गेले. फिर्यादीत म्हटले आहे की, ओमकार चौधरी आणि शुभम अंबुलगे हे व्यंकट धोत्रे व आकाश धोत्रे यांच्यासोबत मिळून सतत गुन्हेगारी कृत्य करत असतात आणि त्यांच्यावर यापूर्वीही मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.
वहाब अत्तार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, व्यंकट धोत्रे आणि आकाश धोत्रे यांच्या सांगण्यावरूनच शुभम अंबुलगे, ओमकार चौधरी (सर्व रा. काळे प्लॉट, उमरगा) आणि इतर चार अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून दीड लाख रुपयांची खंडणी मागितली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
या तक्रारीवरून, पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी ८ आरोपींविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.