उमरगा – उमरगा शहरातील एका बांधकाम गुत्तेदारावर दिवसाढवळ्या झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, उमरगा पोलिसांनी घटनेच्या अवघ्या २४ तासांच्या आत अज्ञात हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून या प्रकरणाचा छडा लावला आहे. जुन्या आर्थिक वादातून हा हल्ला झाल्याचे समोर आले असून, पोलिसांनी तिघा आरोपींना कर्नाटक येथून ताब्यात घेतले आहे, तर एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. जखमी गुत्तेदारावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.
हा हल्ला मंगळवार, दि. १५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ३:४५ ते ४:०० वाजेच्या सुमारास उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी कॉलेज समोर, राष्ट्रीय महामार्गावर घडला. बांधकाम गुत्तेदार गोविंद राम दंडगुले (वय ४०) हे त्यांच्या दुचाकीवरून घराकडे जात असताना, एका नंबर प्लेट नसलेल्या सिल्व्हर रंगाच्या इर्र्टिगा कारमधून आलेल्या तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी त्यांची दुचाकी अडवली. धारदार शस्त्रांनी (कोयत्यांनी) त्यांच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर वार करून हल्लेखोर त्याच इर्र्टिगा कारमधून वेगाने पसार झाले.
रस्त्यावरील नागरिकांनी जखमी गोविंद दंडगुले यांना तात्काळ उमरगा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि तपास पथके तयार करून रवाना केली. गुन्ह्यात वापरलेल्या इर्र्टिगा कारचा पाठलाग करताना, पोलीस उपनिरीक्षक पुजरवाड, सहाय्यक पोलीस फौजदार ओव्हाळ, पोलीस हवालदार कोनगुलवार, पोलीस नाईक कावळे, चालक पोलीस हवालदार कांबळे यांच्या पथकाने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील खजुरी गावाजवळ ती इर्र्टिगा कार पकडली. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन आरोपी गाडी सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले.
पोलिसांनी हार मानली नाही. पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक कन्हेरे, पोलीस उपनिरीक्षक पुजरवाड, पोलीस नाईक यासिन सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ भोरे यांच्या पथकाने रात्रभर कसून शोध मोहीम राबवली. आरोपी कर्नाटकातील बसवकल्याण भागात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पावले उचलली. घटना घडल्याच्या २४ तासांच्या आत, दि. १६ एप्रिल २०२५ रोजी बसवकल्याण तालुक्यातील एका हॉटेलमधून पोलिसांनी राहुल रमाकांत परशेट्टी (रा. मुळज ह.मु. काळे प्लॉट उमरगा), शिवा कुक्कुरडे (रा. कुन्हाळी), आणि प्रदीप कलशेट्टी (रा. जुनी पेठ उमरगा) या तिघांना चौकशीकामी ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता हल्ल्यामागील कारण स्पष्ट झाले. मुख्य आरोपी राहुल रमाकांत परशेट्टी याने सुमारे दोन वर्षांपूर्वी गोविंद दंडगुले यांना प्लॉट मिळवून देण्यासाठी दीड लाख रुपये दिले होते. वारंवार मागणी करूनही दंडगुले यांनी प्लॉट दिला नाही किंवा पैसे परत केले नाहीत. आठ-दहा दिवसांपूर्वी पैसे परत मागितल्यावर दंडगुले यांनी पैसे व प्लॉट देण्यास नकार देऊन, बॉण्डवर पैसे दिले आहेत काय? असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केली होती. याच रागातून राहुल परशेट्टीने आपल्या मित्रांच्या मदतीने गोविंद दंडगुले यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची कबुली दिली.
जखमी गोविंद दंडगुले हे बेशुद्ध असल्याने त्यांचे नातेवाईक फिर्याद देण्यास टाळाटाळ करत होते. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन उमरगा पोलिसांनी तातडीने कारवाई केली. बीट अंमलदार पोलीस हवालदार अतुल जाधव यांनी सरकारतर्फे या प्रकरणी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, उमरगा पोलीस ठाण्यात गु.र.नं. २३४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, १२६ (२), ३ (५) सह शस्त्र अधिनियम कलम ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे करत आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले तीन लोखंडी कोयते आणि हल्ल्यासाठी वापरलेली सिल्व्हर रंगाची इर्र्टिगा कार शासकीय पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात नवतेज तोरणे (रा. काळेप्लॉट उमरगा) नावाचा एक आरोपी फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही संपूर्ण धाडसी आणि महत्त्वाची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे, पोलीस उपनिरीक्षक गंगाधर पुजरवाड, सहाय्यक पोलीस फौजदार प्रदीप ओव्हळ, पोलीस हवालदार चैतन्य कोगुलवार, पोलीस नाईक यासिन सय्यद, पोलीस नाईक अनुरूद्ध कावळे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ भोरे यांच्या पथकाने परराज्यात जाऊन अविरत परिश्रम घेत, वेळेत पार पाडली आहे.
उमरगा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, फरार आरोपी नवतेज तोरणे याच्याबाबत किंवा या गुन्ह्याशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी. कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधावा. उमरगा पोलीस जनतेच्या सेवेत सदैव तत्पर आहेत.