उमरगा: उमरगा पोलिसांनी गोवंशांच्या बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालत एका आरोपीला अटक केली आहे. ईब्राहिम अब्दुल रौफ (वय ३४, रा. हेबळी रोड, न्यु अन्सारी मोहल्ला, आळंद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
रौफ हा २१ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३.२५ वाजता अशोक लीलँड बडा दोस्त (क्र. के.ए.३९-९६८५) या वाहनातून उमरगा ते आळंद रोडवरून प्रवास करत होता. ब्रम्हानंद मंगल कार्यालय जवळ पोलिसांनी त्याच्या वाहनाची तपासणी केली असता, वाहनात पाच गायी आणि एक कारवड दाटीवाटीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. जनावरांना चारा आणि पाण्याची व्यवस्था न करता क्रूरतेने वागवून त्यांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी पोलिसांनी रौफ विरुद्ध प्राण्यास क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(डी), ११(१)(ई), प्राण्यांचे परिवहन अधिनियम ४७, ५४, ४६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गोवंशांच्या चामड्यांसह दोघांना अटक
नळदुर्ग: नळदुर्ग पोलिसांनी गोवंशांच्या चामड्यांसह दोघांना अटक केली आहे. सिद्दीकयॉ शब्बीरमियॉ मौजन (वय ३२) आणि शिवाजी व्यंकटराव पाटील (वय ३०, दोघेही रा. मडकट्टी, ता. भालकी, जि. बिदर, कर्नाटक) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
२१ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११ वाजता गोलाई चौक, नळदुर्ग येथे पोलिसांनी के.ए.५६-७३२९ क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये २,७९,३१६ रुपये किमतीच्या गोवंशांच्या चामड्या आढळून आल्या. जनावरे ठार मारून त्यांच्या चामड्यांची अवैधरित्या विक्रीसाठी वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ट्रकसह चामड्यांची एकूण किंमत ७,७९,३१६ रुपये आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध प्राण्यास क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११ सह कलम ५(अ), ९(अ) आणि भा.न्या.सं. कलम ३२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.