उमरगा : उमरगा तालुक्यातील कवठा शिवारातील एका शेतातील गोठ्यात सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल तिरट जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी (दि. ०८) सायंकाळी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ३ कार, ९ मोबाईल फोन आणि रोख रकमेसह एकूण १७ लाख ५८ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सदाशिव शेलार यांना कवठा शिवारातील दयानंद सोनवणे यांच्या शेतातील गोठ्यामध्ये काही व्यक्ती तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, त्यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी सुमारे ६:२० वाजता सदर ठिकाणी छापा टाकला.
या छाप्यात शाम निशीकांत काळे (वय ३२), समीर सर्फराज शेख (वय २१), आकाश राम कदम, महेश मोहन काळे (वय ३५), किशोर बालाजी ननुरे (वय ३४), कैलास शेषेराव पुजारी (वय ३५), गोपाळ पंड पंजारी (वय ४५), हबीब दस्तगीर सय्यद (वय ४०), दत्ता पुन्नु चव्हाण (वय ४४), जितेंद्र ज्ञानोबा काळे (वय ३८), विवेकानंद शंकरराव सोनवणे (वय ४८) आणि सचिन हरिदास गायकवाड (वय ३२) यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले. हे आरोपी उमरगा, औसा, आणि लोहारा तालुक्यातील रहिवासी आहेत.
पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम १३,९०० रुपये, ९ मोबाईल फोन आणि ३ चारचाकी गाड्या असा एकूण १७,५८,६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या सर्व आरोपींविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या आदेशानुसार, व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सदाशिव शेलार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईमुळे उमरगा परिसरातील अवैध धंद्यांचे धाबे दणाणले आहेत.