उमरगा : उमरगा शहरातील मुख्य बाजारपेठ आणि वर्दळीचे ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे. येथील ‘श्रीलीला ज्वेलर्स’ या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल ५ लाख रुपयांचे चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी (दि. १४) उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्ता विलास पोतदार (वय ३५, रा. माशळकर गल्ली, भीमनगर, उमरगा) यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात, गणपती मंदिराजवळ ‘श्रीलीला ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. रविवारी, १४ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ०२:५२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी दुकानातील ४०८३ ग्रॅम (सुमारे ४ किलो) वजनाचे चांदीचे दागिने लंपास केले. चोरीला गेलेल्या या दागिन्यांची एकूण किंमत ५ लाख ३१ हजार १४ रुपये इतकी आहे.
याप्रकरणी दत्ता पोतदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१ (४) आणि ३०५ (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरचौकात घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.






