उमरगा : शारीरिक संबंध ठेवण्यास आणि गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावल्याने एका २८ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील कसगीवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंजुषा केशव माशाळे (वय २८, रा. कसगीवाडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील केशव निवृत्ती माशाळे (वय ६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्जुन शिवराम लवटे (रा. कसगीवाडी) याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अर्जुन लवटे हा मयत मंजुषा यांना ‘माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, गुन्हा माघार घे, नाहीतर तुला जिवे मारून टाकीन’ अशा धमक्या देत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून मंजुषा यांनी दिनांक ४ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट २०२५ दरम्यान रावसाहेब लवटे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले.
या घटनेनंतर तब्बल १५ दिवसांनी, २० ऑगस्ट २०२५ रोजी वडील केशव माशाळे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी अर्जुन लवटे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), कलम ७५ (१) आणि कलम ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.